अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पादुकांचा सोमवारी दर्शन सोहळा; साताऱ्यात शाहू क्रीडा संकुलाजवळ लॅन्ड मार्क टॉवरमध्ये भाविकांना दर्शन

by Team Satara Today | published on : 03 December 2025


सातारा  :  अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्‌गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र पादुका सोमवारी ८ डिसेंबर रोजी साताऱ्यातील भाविकांसाठी दिव्य दर्शन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजन समितीच्यावतीने श्रीधर कंग्राळकर, आशिष कदम, ओमकार राजेभोसले, सम्राट साळुंखे, महेश चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे, की अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्‌गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष कृपावंत होऊन आपल्या पवित्र पादुका प्रदान केल्या होत्या. या पवित्र पादुकांचे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील  भाविकांना दर्शन व्हावे, या उद्देशाने श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट व श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे. 

या पवित्र आणि पादुका भाविकांच्या दर्शनासाठी शनिवारी (ता. सहा) डिसेंबरपासून दौरा सुरू होणार आहेत. या सोहळ्याचे सोमवारी (ता. आठ) डिसेंबरला साताऱ्यात आगमन होणार आहे. सकाळी राजघराण्यांत पवित्र पादुकांचे विधिवत पूजन करण्यात येईल. त्यानंतर दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत शाहू क्रीडा संकुलाजवळ लॅन्ड मार्क टॉवरमध्ये भाविकांना दर्शन व कृपा आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी विधिवत विराजमान करण्यात येणार आहेत. दर्शनाची संपूर्ण व्यवस्था याच ठिकाणी करण्यात येत आहे. त्यानंतर नऊ डिसेंबरला फलटणमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर मिरज, सांगली, मुधोल, पोण्डा, पणजी, सावंतवाडी, कागल, कोल्हापूर, भोर, पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे आणि डोंबिवली आदी ठिकाणी भाविकांना कृपापादुकांचे दिव्य दर्शन घेण्याची अद्वितीय योग उपलब्ध होणार आहे. 

या पवित्र कार्यासोबतच अजून एक कार्य श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे पार पाडू इच्छित आहे, ते म्हणजे स्वामीभक्तांच्या सेवेसाठी ‘अनुभूती’ या नावाचा एक भव्य प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे. या प्रकल्पांतर्गत श्री स्वामी समर्थांची १०८ फूट भव्य दिव्य मूर्ती, ध्यान केंद्र, चिकित्सालय, उद्यान, भक्तनिवास आदी अशा मूलभूत आणि पूरक सुविधांच्या विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. स्वामींच्या कृपापादुकांच्या दर्शनाचा साताऱ्यातील सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात पालिका निवडणुकांसाठी 66.59% मतदान; मेढा नगरपंचायतीत सर्वाधिक 84% मतदान झाल्याने धाकधूक वाढली
पुढील बातमी
जिल्ह्यात चार मंत्री परंतु उद्योगवाढीकडे दुर्लक्ष ; निवडणुका पुढे ढकलण्यास आयोगच दोषी : आ. शशिकांत शिंदे यांची टीका

संबंधित बातम्या