एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर, प्रताप सरनाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश

by Team Satara Today | published on : 27 October 2026


मुंबई :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दिवाळीपूर्वी वेतन देण्याचा दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध व्हावी, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला सप्टेंबर २०२६ मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी ₹३९१.०२ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्गमित झाला आहे.
एसटी महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणतः दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळावे, यासाठी मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने पाठपुरावा केला.
आर्थिक व्यवहारांना गती मिळण्यास मदत
एसटी महामंडळाच्या प्रवासी सवलत योजनांपोटी शासनाकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमेला महामंडळाच्या आर्थिक नियोजनात महत्त्वाचे स्थान आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवासी सवलतींची अंमलबजावणी करताना महामंडळावर मोठा आर्थिक भार येतो. या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी निधी वेळेत उपलब्ध झाल्यास महामंडळाच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळण्यास मदत होते.
शासन आणि एसटी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी
शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीपूर्व वेतनासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर आर्थिक अडचणींचे सावट पडू नये, यासाठी शासन आणि एसटी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
...तर बातमी देण्याच्या मूळ उद्देशालाच धक्का बसेल; डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनची भूमिका
पुढील बातमी
एका कॉलवर बालकाला मिळाला आधार ! चाईल्ड हेल्पलाइन १०९८ च्या तत्परतेमुळे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बालकाला मदतीचा हात

संबंधित बातम्या