१०० वे साहित्य संमेलन न भूतो न भविष्यति व्हावे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; सरकार सर्वतोपरी मदत करेल, काहीही कमी पडू देणार नाही

by Team Satara Today | published on : 04 January 2026


स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत सातारा  : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीमध्ये ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाल्यानंतर आता १०० वे मराठी साहित्य संमेलन हे ‘न भूतो न भविष्यति’असे व्हावे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल आणि काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज (दि.४) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई, आमदार भरत गोगावले, महेश शिंदे, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनिताराजे पवार, उपाध्यक्ष गुरैय्या स्वामी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्र्विनी नागराजन, प्रशासकीय अधिकारी अभिजित बापट, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नंदकुमार सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचे संरक्षक, ज्येष्ठ उद्योजक फरोख कूपर यांचा तसेच व्ही. पी. परांजपे ऑटो कास्टचे व्हाईस प्रेसिडेंट ऋषिराज यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

मराठी जागतिक व्यवहाराची भाषा होण्यासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री

साहित्य संस्थांमध्ये कोणताही राज्यकीय हस्तक्षेप नसेल आणि हिंदी सक्ती कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही. मराठी भाषेचाच मानसन्मान वाढवला जाईल असा निर्वाळा देऊन उपमुख्यमंत्री म्हणाले, माय मराठीच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत. माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे. आपली तपश्चर्या फळाला आली अशी भावना आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठीसाठी जे जे करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी भाषा भवनाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. दिल्लीमध्ये कुसुमाग्रजांच्या नावाने भाषा केंद्र सुरू केले आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंच सुरू केले आहेत. मराठी भाषेसमोर एआयचे आव्हान असले तरी मराठी ही केवळ संवादाची भाषा न राहता ती जागतिक व्यवहाराची भाषा व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. या वर्षी संमेलनासाठी ३ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

संमेलन मराठी भाषेचा, साहित्याचा महाकुंभ : उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, मराठ्यांचा पराक्रम अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या साताऱ्यात हे संमेलन होत आहे याचा खूप आनंद आहे. त्यामुळे संमेलनाला काहीही कमी पडू नये, अशी आमची भावना होती. ज्या मोठ्या संख्येने मराठी साहित्यप्रेमींनी उपस्थिती दाखवली त्यामुळे संमेलनाची शोभा वाढली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा ९९ वर्षे सुरू असलेला साहित्यमेळा आहे. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा हा उत्सव आहे. मराठी स्वाभिमानाचे हे माहेरघर आहे. मराठी भाषेचा, साहित्याचा हा महाकुंभ आहे. १०० वर्षे चाललेला असा उपक्रम अन्य कोणत्याही भाषेत नाही ही मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आहे. 

गावागावांत एसटी स्थानकांवर पुस्तकांसाठी गाळे उपलब्ध करणार : उपमुख्यमंत्री 

मराठी भाषेच्या प्रसारासाठी आणि वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी गावागावांत जिथे एसटी स्थानके आहेत तिथे पुस्तकविक्रीचे गाळे सुरू करावेत, अशी मागणी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी उद्घाटनपर भाषणात केली होती. त्याचा संदर्भ देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, करतो, सांगतो, पाहतो असे सांगून नुसती आश्वासने मी देत नाही. परिवहन मंत्र्यांना सांगून ती जागा आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल. तसेच मराठी भाषेच्या संदर्भातील इतरही मागण्यांचा आम्ही पाठपुरावा करू, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सामाजिक वास्तवावर आसूड ओढणाऱ्या कवितांनी निमंत्रितांचे कविसंमेलन गाजले; मानवी जीवनातील विदारक वास्तव मांडणाऱ्या कवितांनी रसिकांना केले अंतर्मुख
पुढील बातमी
मराठी साहित्य संमेलनाला लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता पुढील नाट्य संमेलनाचे यजमानपदही साताऱ्याला मिळावे : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

संबंधित बातम्या