सातारा : कृषी विभाग व शेती उत्पन्न बाजार समिती, कराड यांचे संयुक्त विद्यमाने स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला (बैल बाजार) आवार, शेती उत्पन्न बाजार समिती, कराड येथे 26 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करणेत आला आहे. या महोत्सवाचे उद्दघाटन शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांनी दिली आहे.
कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शने हा महत्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालने, विविध कंपन्याची दालने, प्रात्यक्षिके, खाद्य पदार्थांचे स्टॉल यांचा समावेश आहे. कृषी व कृषी पूरक व्यवसायांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी व कृषी संलग्न विभागाचा सक्रीय सहभाग राहणार आहे. शासकीय यंत्रणे बरोबरच खाजगी कंपन्या, उदयोजक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचाही सहभाग आहे, असे जिल्हा कृषि महोत्सवाचे स्वरुप असणार आहे.
महोत्सव कालावधीत दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी विविध विषयाचे परिसंवादाचे आयोजन करणेत आले आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था जिल्हयातील शेतक-यांनी उत्पादीत व प्रक्रीया केलेल्या दर्जेदार मालाची विक्री श्रृंखला विकसीत करणेस प्रोत्साहित करावाच्या दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीसाठी स्वंतत्र दालन उभारणेत आलेले आहे. २९ डिसेंबर रोजी खरेदीदार-विक्रेता संम्मेलन आयोजित केले आहे. जिल्हयातील कृषी व कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पिक स्पर्धा विजेते शेतकरी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
कृषी विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतक-यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार शेतकरी विपणन साखळी समक्षीकरण. समुह गट संघटीत करुन स्थापीत शेतकरी उत्पादक कंपन्याची क्षमता बांधणी करणे. शेतक-यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा या करिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे. कृषी विषयक परिसंवाद,व्याख्याने यांच्या माध्यमातून न विचारांच्या देवाण-घेवाणीद्वारे शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे. विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना देणे व शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी करावयाचे उपाययोजनां बाबत शेतक-यामध्ये जागृती निर्माण करणे हा जिल्हा कृषि महोत्सवाचा उददेश आहे. सातारा जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जिल्हा कृषि महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहनही श्री. शेंडे यांनी केले आहे.