मलकापूर : उड्डाणपुलासाठी वापरलेले लाँचर मशीन उतरवण्यासाठी रविवारी शिवछावा चौकात अडीच तास वाहतूक बदलाची चाचणी घेण्यात आली. चाचणीवेळी अचानक वाहतुकीत बदल केल्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन काहीकाळ वाहतूककोंडी झाली हाती. त्रुटी दूर करून पुढील निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले.
येथील युनिक उड्डाणपुलाचे सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी वापरलेले भले मोठे लाँचर मशीन उतरवण्याचा काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. हे मशीन उतरवण्याचे काम पंधरा दिवस चालणार आहे. यासाठी शिवछावा चौकातील जागा निश्चित केली आहे. हा परिसर अतिशय वर्दळीचा असल्याने प्रशासनाकडून आधी चाचणीचा निर्णय घेण्यात आला होता. लाँचर उतरवण्याचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली जात आहेत.
त्यानुसार रविवारी शिवछावा चौकात पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, अदानीचे मुकेश, डीपी जैनचे नागेश्वर राव, राजीव बक्षी, सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अडीच तास वाहतूक बदलाची चाचणी घेण्यात आली.
यासाठी पोलिस उपनिरीक्षक विजय बोहिटे, भैरीनाथ कांबळे, संभाजी उटुगडे, दस्तगीर आगा, महेश चाबुकसवार, याच्यासह कर्मचारी व १३ वॉर्डन आणि शेवनस्टार ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते. चाचणीवेळी अचानक वाहतुकीत बदल केल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन काहीकाळ वाहतूककोंडी झाली हाती.