सातारा : महाराष्ट्रामध्ये गुटखा सुगंधी, पान मसाला यांचे उत्पादन वितरण व विक्रीवर बंदी असतानाही जिल्ह्यात गुटख्याची फार मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे विक्री सुरू असून सातारा जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास केवळ शाळा, महाविद्यालय परिसरात नव्हे तर विविध शासकीय कार्यालयांच्या भिंती व कोपरे गुटख्याच्या पिचकारीने लाल भडक होत असल्याचे चित्र दिसून येत असतानाही जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एकही मोठी कारवाई न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकूणच कारवाई अभावी टपरी चालक जोमामध्ये असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रामध्ये गुटखा, सुगंधी पानमसाला यावर बंदी घातल्यानंतर परराज्यातून अवैद्य मार्गाने मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधी पान मसाला, सुपारी आणली जात आहे. या गुटख्याची विक्री सातारा जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर होत असून शाळा, महाविद्यालय, बस स्थानक, शासकीय कार्यालय परिसरात असणाऱ्या टपऱ्यांसह आता विविध दुकानांमध्येही गुटखा, सुगंधी पान मसाला, सुपारी अगदी सहजपणे उपलब्ध होत असताना दिसून येत आहे. सातारा शहरातील बस स्थानक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसर, राजवाडा, पोवई नाका, बॉम्बे रेस्टॉरंट या परिसरात बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या संबंधितांचे फार मोठे रॅकेट असल्याचे स्पष्ट होत असून या परिसरात अगदी सहजपणे गुटखा उपलब्ध होत आहे. या बेकारीशीर गुटखा विक्रीवर कोणाचीही नियंत्रण नसून अन्न व औषध प्रशासन विभाग केवळ कागदावरच आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
राज्यात गुटखा तस्करीचे प्रमाण भीषण
१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्यात झालेल्या कारवायांचा आढावा घेतला असता एकूण ३६५ दुकानांवर छापे टाकण्यात आले आहेत त्यामध्ये ३५४ दुकानांमध्ये बंदी असणारा गुटखा व सुपारी आढळून आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी २२ कोटी १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून महाराष्ट्रात किती मोठ्या प्रमाणावर गुटखा, पान मसाला, सुपारी यांची विक्री होते हेच यावरून स्पष्ट होत आहे.
अल्पवयीन मुलांवर गंभीर परिणाम
राज्यासह सातारा जिल्ह्या्लाही गुटख्याने फार मोठ्या प्रमाणात विळखा घातला असून गुटखा शाळा व महाविद्यालय परिसरात सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा अल्पवयीन मुलांवर गंभीर परिणाम होत असताना दिसून येत आहे. अनेकदा दुकानदारांवर कारवाया करूनही विक्री पुन्हा सुरू होत असल्याचे एफडीएचे निरीक्षण असतानाही संबंधित विभागाला गुटखा विक्रीवर ठोस उपाययोजना करण्यात अपयश येत आहे, हे विशेष आहे.
केवळ कायदे नको, कारवाईची आवश्यकता
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांची साखळी तोडण्यासाठी संबंधितांना मोक्का लागू करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा स्वागतार्ह अशीच आहे मात्र केवळ कायदे करून अथवा कारवाईची भीती दाखवून उपयोग नाही तर ठोस कारवाई झाली तरच व्यसनांपासून पिढी बरबाद होण्यापासून वाचेल, अशा बोलक्या प्रतिक्रिया आता व्यक्त होऊ लागल्या आहेत.