सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी सकाळी दहा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून सहा फुटांपर्यंत उचलण्यात आले आहेत. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला असून प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या वक्र दरवाजांमधून ३२ हजार ७७६ क्युसेक तर कोयना धरण पायथा विद्युतगृहाच्या एका युनिटद्वारे १ हजार ५० क्युसेक असा एकूण ३३ हजार ८२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने आणि आवक वाढल्यास सांडव्यावरून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात आणखी वाढ केली जाण्याची शक्यता धरण प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.
धरणातून विसर्ग वाढवल्याने कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्राजवळील आणि किनाऱ्यावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित ग्राम प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांना पूर्ण सतर्क राहून योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून देण्यात आले आहेत.