बारामती : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, या हेतूने पीएम कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्यात येत आहे. ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रीत सौर प्रकल्प योजना आहे. या योजनेतून पुर्ण झालेल्या बारामती परिमंडळातील व्याहळी जि.पुणे (10 मेगावॅट), मरीआईचीवाडी जि.सातारा (13 मेगावॅट), सांगोला जि.सोलापूर (10 मेगावॅट) या तीन सौर प्रकल्पांचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (दि.25 सप्टेंबर रोजी) व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे लोकार्पण करण्यात आले. या तीन सौरप्रकल्पांमुळे 6 हजार 583 शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील व्याहळी सौर प्रकल्पामुळे 2 हजार 100 कृषी ग्राहकांना दिवसा वीज
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत व्याहळी ता. इंदापूर जि.पुणे येथे 26 एकर गायरान जमिनीवर 10 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प 33/11 केव्ही शेळगाव या उपकेंद्राशी जोडण्यात आलेला आहे. या उपकेंद्रावरील कडबनवाडी, तेलओढा, नाझरकर, शिरसटवाडी, वीरझरा या कृषीभारीत 11 केव्ही वीज वाहिन्यांवरील (फिडर) 14 गावे- वाड्यांतील 2 हजार 100 कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे. शेळगाव, तेलओढा, वैदवाडी, कडबनवाडी, शिरसटवाडी, हगारेवाडी, हनुमानवाडी, शिंगाडेवस्ती, पागळे वस्ती ननवरे वस्ती, भुजबळ वस्ती, राऊत वस्ती, गावडे वस्ती, खोमणे वस्ती या गावातील कृषी ग्राहक व्याहळी सौर प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहेत.
सौरप्रकल्प लोकार्पण प्रसंगी प्रकल्पस्थळी मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता दिपक लहामगे, बारामतीचे प्रभारी कार्यकारी अभियंता सचिन कोरडे, वालचंदनगरचे उपकार्यकारी अभियंता अतुल गलांडे, इंदापूरचे उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे, माऊली चौरे, प्रगतीशील बागायदार शेतकरी आबासाहेब भरणे, धनंजय शेंडे, सरपंच उर्मिला शिंगाडे (शेळगाव), दादा पाटोळे (व्याहळी), जयकुमार रावण (शिरसटवाडी), सतिश हगारे (हगारेवाडी), दादासो जाधव (कडबनवाडी), आवादा कंपनीचे व्यवस्थापक रविंद्र रजपूत यांच्यासह महावितरणचे स्थानिक अधिकारी, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
सातारा जिल्ह्यातील मरीआईचीवाडी सौर प्रकल्पामुळे 2 हजार 387 कृषी ग्राहकांना दिवसा वीज
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत मरीआईचीवाडी ता.फलटण जि.सातारा येथे 37 एकर गायरान जमिनीवर 13 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प 33/11 केव्ही लोणंद एमआयडीसी स्विचिंग स्टेशन या उपकेंद्राशी जोडण्यात आलेला आहे. या उपकेंद्रावरील अंधोरी व पिंपरे या कृषीभारीत 11 केव्ही वीज वाहिन्यांवरील (फिडर) 13 गावांतील 2 हजार 387 कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे. मरियाची वाडी, कराडवाडी, वाघोशी, अंदोरी, रुई, शेडगेवाडी, बाळूपाटीलची वाडी, बावकलवाडी, पाडेगाव खंडाळा, पाडेगाव फलटण, पिंपरे, डापकेघर, लोणंद या गावातील कृषी ग्राहक या सौर प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहेत.
सौरप्रकल्प लोकार्पण प्रसंगी प्रकल्पस्थळी अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर, फलटणचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये, कार्यकारी अभियंता देवदास कोरडे, सरपंच जालिंदर रासकर, देविदास चव्हाण, हर्षवर्धन शेळके पाटील, धनाजी अहिरेकर ,दत्तात्रय बिचुकले,दत्तात्रय भुजबळ ,शंकर धडस, कोंडीबा उंबरटकर, यांच्यासह महावितरणचे स्थानिक अधिकारी, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला सौर प्रकल्पामुळे 2 हजार 96 कृषी ग्राहकांना दिवसा वीज
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सांगोला ता.सांगोला जि.सोलापूर येथे 32 एकर गायरान जमिनीवर 10 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प 33/11 केव्ही यलमार मंगेवाडी या उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. या उपकेंद्रावरील कमलापूर ,यलमार मंगेवाडी ,अजनाळे , लिगाडेवाडी, वाटबरे, बलवडी
या कृषीभारीत 11 केव्ही वीज वाहिन्यांवरील (फिडर) 07 गावांतील 2 हजार 96 कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे. यलमार मंगेवाडी, कमलापूर, अजनाळे, लिगाडेवाडी, वझरे, चिनके, सोनलवाडी या गावातील कृषी ग्राहक सांगोला सौर प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहेत.
सौरप्रकल्प लोकार्पण प्रसंगी प्रकल्पस्थळी अधीक्षक अभियंता सुनिल माने, पंढरपूरचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, सरपंच सौ. शितल सचिन भडंगे, माजी सरपंच दत्ता मासाळ, उपसरपंच अनिल पाटील (यलमर मंगेवाडी), सनस्ट्रिम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दिलीप कुमार यांच्यासह महावितरणचे स्थानिक अधिकारी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.