सातारा : सोनिया व राहुल गांधी यांच्यावरील ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने, कारवायांनी काँग्रेस डगमगणार नाही. भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी समोर जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ अल्पना यादव, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कदम, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ अण्णा कुंभार, एड दत्तात्रय धनावडे, अन्वर पाशा खान, कोरेगाव चे अध्यक्ष एड श्रीकांत चव्हाण, जावळीचे अध्यक्ष संदीप माने, प्रा. विश्वंभर बाबर, अमर करंजे, अरबाज शेख, विजयराव मोरे, सुरेश इंगवले, संतोष डांगे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. याआधीही ईडीने सोनिया व राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे यावेळी नरेश देसाई यांनी सांगितले.