सातारा भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस तीव्र; नगरपालिका सभेतील वादानंतर उदयनराजेंकडून नगरसेवकांची जलमंदिरमध्ये बैठक, संयम राखण्याच्या सूचना

by Team Satara Today | published on : 13 May 2026


सातारा  : सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घडलेल्या बनकर-खंदारे वादाचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, या प्रकरणानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या गटातील नगरसेवकांची तातडीची बैठक घेतल्याने शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीला उपनगराध्यक्ष एडवोकेट दत्ता बनकर व पक्षप्रोड मिशन पाटील अनुपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

नगरपालिकेच्या सभेत उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. विषयांवरील चर्चेदरम्यान खंदारे यांनी बनकर यांच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर हुकूमशाही शैलीत कारभार चालवण्याचा आरोप केला. “अधिकार नसलेल्या पदाधिकाऱ्यांकडे कामे नेऊ नयेत,” असा टोला लगावत त्यांनी सभागृहातच वातावरण तापवले. या वक्तव्यामुळे खासदार गटातील नगरसेवकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

सभागृहातील वातावरण नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेनंतर भाजपमधील आमदार गट आणि खासदार गटातील सुप्त नाराजी पुन्हा उघड झाल्याची चर्चा रंगली आहे.

सायंकाळी जलमंदिर येथे झालेल्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी संबंधित नगरसेवकांकडून संपूर्ण घडामोडींची माहिती घेतली. बैठकीत काही नगरसेवकांनी सभागृहातील आक्रमक भाषाशैलीबाबत नाराजी व्यक्त केल्याचे खात्रीशीर माहिती आहे. शहरातील राजकीय समन्वय बिघडू नये, तसेच आगामी कार्यक्रमांवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी संयम राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. दत्ता बनकर यांच्या कार्यपद्धती संदर्भात बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली .

दरम्यान, सातारा भाजपमधील वाढती अंतर्गत अस्वस्थता आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरू शकते, अशी चर्चा आता खुलेआम सुरू झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फिरायला गेलेल्या कोंडवे येथील वृद्धाचा वडाची फांदी अंगावर कोसळून दुर्दैवी मृत्यू
पुढील बातमी
साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा; विजेच्या धक्क्यात १८ मेंढ्यांचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयात झाडे कोसळली, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

संबंधित बातम्या