2029 ची रणनीती आतापासूनच; वाई-पाटणमध्ये भाजप संघटन विस्ताराच्या मोहिमेला वेग

by Team Satara Today | published on : 11 July 2026


सातारा : आगामी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2029 च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने वाई-पाटण परिसरात संघटन विस्तारावर भर देण्यास सुरुवात केली आहे. वाई येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार धैर्यशील कदम यांनी बूथस्तरापासून पक्षाची ताकद वाढविण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना कदम यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वाई आणि पाटण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविल्याचा उल्लेख केला. पक्षाच्या भविष्यातील राजकीय नियोजनासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात आणि प्रत्येक मतदान केंद्रावर सक्रिय राहून संघटन मजबूत करावे, असे त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रभावी उपस्थिती नोंदविणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी जास्तीत जास्त ठराव पक्षाच्या बाजूने मिळविण्यासाठी पदाधिकार्‍यांनी प्रयत्न वाढवावेत, असे निर्देश दिले.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेतही कार्यकर्त्यांनी सहभाग वाढविण्याचे आवाहन करत त्यांनी दुबार, स्थलांतरित व मृत मतदारांची नावे पडताळून आवश्यक हरकती दाखल करण्यावर भर दिला. मतदार यादी अचूक करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना भविष्यात योग्य संधी दिली जाईल, असा विश्वास व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाच्या प्रतिनिधींना विकासकामांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाई शहरातील मतदार पडताळणी मोहिमेचा आढावा सादर केला. बूथनिहाय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन घरभेटींद्वारे मतदार नोंदणी व पडताळणीचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

बैठकीस माजी आमदार मदन भोसले, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, विराज शिंदे, रोहिदास पिसाळ तसेच वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडात अवैध अग्नीशस्त्र विक्रीचा डाव हाणून पाडला
पुढील बातमी
पिंपोडे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एस.टी फेरी सुरु करा अन्यथा आंदोलन

संबंधित बातम्या