सातारा : सातारा जिल्ह्यातील जनतेच्या मनाचे लाडके राजे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आहेत. त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातार्याच्या जनभावनेचा सन्मान करावा. अन्यथा याविरोधात पुढील काही दिवसात उपोषण करण्यात येईल, असा इशारा बाबाराजे समर्थक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचनताई साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
कांचनताई पुढे म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात भाजपचे राजकीय वर्चस्व आहे. तरीसुद्धा भाजपचा पालकमंत्री सातारा जिल्ह्याला मिळाला नाही, याची खंत सर्वसामान्य जनतेला आहे. पालकमंत्री पदासाठी कोणते निकष लावले गेले हे स्पष्ट करावे. या जिल्ह्याला छत्रपती शाहू फुले क्रांतिवीरांचा व यशवंत विचारांचा वारसा आहे. यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी आपले कार्य कर्तृत्व आपल्या कामातून सिद्ध केले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सुसंस्कृत, संयमी व सर्व नेते मंडळींना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे. जबाबदारी पार पाडण्याची ताकद व कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. सातार्याचे पालकमंत्री पद देऊन भाजपने त्यांचा सन्मान करावा आणि त्यांना पालकमंत्री पदावर संधी द्यावी. पालकमंत्री पदाचा निर्णय बदलावा, अन्यथा जिल्ह्यात होणार्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कमळ हाती घेण्याला सातारा जिल्ह्यातील जनतेचा व आमचा नकार असल्याची भूमिका आम्ही आमच्या नेत्यांकडे मांडणार आहोत, असे कांचनताई यांनी सांगितले.
सातार्याला पालकमंत्री पद मिळूनही सातारा जिल्ह्यात शोककळा असल्याचे वातावरण आहे. याचा गांभीर्याने विचार करून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद बदलण्यात यावे. पालकमंत्री बदल होत नाही तोपर्यंत जनतेला उपोषणाचा मार्ग निवडावा लागू नये, असा इशारा कांचन साळुंखे यांनी देत आक्रमक भूमिका घेतली आहे.