नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा मोठा दिलासा; ३५० रुपयांत एका महिन्याचा अमर्याद लोकल पास

by Team Satara Today | published on : 22 August 2026


दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवरून नियमित प्रवास करणाऱ्या आणि टोल नाक्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे. NHAI ने आपल्या ‘डिजिटल लोकल पास’ सेवेचा देशभरातील तब्बल १२१ टोल प्लाझांवर विस्तार केला आहे. यामुळे स्थानिक वाहनचालकांना दररोज लागणाऱ्या टोलच्या भुर्दंडापासून मुक्ती मिळणार असून, अवघ्या ३५० रुपयांत एका महिन्याचा अमर्याद लोकल पास उपलब्ध होणार आहे.

टोलच्या २० किमी परिघातील वाहनांनाच लाभ

या सुविधेचा लाभ टोल प्लाझाच्या २० किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या नागरिकांना घेता येईल. हा पास केवळ वैयक्तिक/अव्यावसायिक वाहनांसाठीच वैध असेल. व्यावसायिक वापराच्या वाहनांना ही सवलत लागू नसेल. 

प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल

पूर्वी लोकल पास मिळवण्यासाठी वाहनचालकांना प्रत्यक्ष टोल नाक्यावर जाऊन कागदपत्रे जमा करावी लागत होती. आता ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. पात्र वाहनचालक ‘राजमार्ग यात्रा’ ॲपच्या माध्यमातून थेट अर्ज करू शकतात. पत्त्याच्या पडताळणीसाठी डिजीलॉकर, वाहनाच्या तपशिलासाठी ‘वाहन डेटाबेस’ आणि लिंक केलेल्या फास्टॅगची माहिती ऑनलाइन ऑटोमॅटिक पद्धतीने पडताळली जाईल.

शुल्क किती असेल?

नॅशनल हायवे युझर फी नियमांनुसार या डिजिटल लोकल पाससाठी प्रतिमहिना ३५० रुपये इतके निश्चित शुल्क आकारले जाईल. फास्टॅगद्वारे थेट टोल क्लिअरन्स मिळत असल्याने टोल प्लाझावरून गाड्या न थांबता सहज पुढे जाऊ शकतील.

बॅरियर-लेस टोलिंगच्या दिशेने मोठे पाऊल

हा डिजिटल लोकल पास लागू करणे हे मल्टी-लेन फ्री फ्लो आणि बॅरियर-लेस (अडथळामुक्त) टोलिंग सिस्टीमच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे. जुलै २०२६ मध्ये दिल्लीतील मुंडका-बक्करवाला टोल प्लाझावर MLFF प्रणालीचा यशस्वी प्रयोग सुरू करण्यात आला होता. सध्या ही सुविधा चोर्यासी, मुंडका, दौलतपुरा, घरौंदा, मनोहरपूर आणि शाहजहाँपूर या ६ ठिकाणी कार्यरत आहे. या टोलनाक्यांवर मानवरहित (विना कर्मचारी) यंत्रणा असल्याने स्थानिक नागरिकांना टोल न भरल्याबाबत चुकीच्या ई-नोटीसा जात होत्या. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून आता डिजिटल पासची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाविपच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल; काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते समाेरासमोर आल्याने काही काळ तणाव
पुढील बातमी
मायणी येथील मालमत्ता व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर; देशमुख, शिंदे यांना पोलिस कोठडी

संबंधित बातम्या