ना. जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने ग्रामीण विकासाचा बिगुल; फडणवीस-शिवराज चौहान यांच्या होणार उपस्थितीत ५ लाख घरांचे लोकार्पण ; १५ मे रोजी महायुतीचे साताऱ्यात राजकीय शक्तिप्रदर्शन

by Team Satara Today | published on : 11 May 2026


सातारा : केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून ग्रामीण भागातील घरकुल योजनांना मोठी गती मिळाल्याचा दावा करत महायुती सरकारने आता साताऱ्यात मोठा शक्तिप्रदर्शनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या ५ लाख घरांचे लोकार्पण आणि लाभार्थ्यांना निधी वितरणाचा भव्य कार्यक्रम १५ मे रोजी साताऱ्यात पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून सातारा जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे महायुतीच्या ग्रामीण जनसंपर्क मोहिमेचा भाग म्हणूनही पाहिले जात आहे.

जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देत लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती सुनिश्चित करण्यावर भर दिला. “राज्यभरातील ग्रामीण कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यामागे सरकारची ठाम भूमिका आहे. साताऱ्यातील कार्यक्रम हा केवळ लोकार्पण सोहळा नसून ग्रामीण विकासाच्या वचनपूर्तीचा उत्सव आहे,” असे ते म्हणाले.

सैनिक स्कूल मैदानावर भव्य मंडप उभारला जाणार

या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध भागांतून लाभार्थ्यांना आणण्यासाठी सुमारे ४०० एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली असून सैनिक स्कूल मैदानावर भव्य मंडप उभारला जाणार आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पंखे, कुलर, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच भोजन पॅकेटचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

केंद्रीय व राज्यस्तरीय मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे हेलिकॉप्टरसाठी स्वतंत्र हेलीपॅडची उभारणी

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत कार्यक्रमासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. केंद्रीय व राज्यस्तरीय मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे हेलिकॉप्टरसाठी स्वतंत्र हेलीपॅडची उभारणीही केली जाणार आहे.

बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, आमदार मनोज घोरपडे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कर्ज फेडूनही माणदेशी बँकेकडून दिव्यांग महिलेची अडवणूक
पुढील बातमी
रॉकेल वितरण व्यवस्थेतील त्रुटींवर दुकानदार संघटना आक्रमक; पुरवठा अधिकाऱ्यांकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

संबंधित बातम्या