सातारा : 14 विद्या आणि 64 कला यांची अधिदेवता असणार्या लाडक्या गणरायाचे शनिवारी वाजत गाजत, उत्साहात सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे. हा उत्सव भक्तिमय परंपरेने साजरा करण्यासाठी गणेश कार्यकर्ते सज्ज झाले असून पोलीस दल सुद्धा या निमित्ताने सतर्क झाले आहे. जिल्ह्यात 4 हजारांपेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून सातारा शहरामध्ये 316 मंडळांच्या बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे.
यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा असून या उत्सवाची तयारी गणेशोत्सव मंडळांनी अंतिम टप्प्यात आणली आहे. शहरातील सुमारे 120 मंडळांनी आवश्यक तांत्रिक परवानग्या पूर्ण करून बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला केसरकर पेठ व शुक्रवार पेठेतील कुंभार गल्लीमध्ये लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मोती चौक ते पंचमुखी गणेश मंदिर परिसर पूजा साहित्याच्या खरेदीसाठी गर्दीने फुलून गेला होता. सातारा पोलिसांनी सुद्धा शहरातील एन्ट्री पॉईंट सह वर्दळीच्या चौकांमध्ये ज्यादा बंदोबस्त तैनात केला असून मुख्य चौकांमध्ये नाईट व्हिजन मोडच्या सीसीटीव्ही कॅमेर्याची तसेच विसर्जन मार्गावरील रस्त्यांवर विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. बुधवार नाका परिसरातील विसर्जन तळ्यावर पाच, तर विसर्जन मार्गावर 18 सीसीटीव्ही कॅमेर्याची सोय करण्यात आली आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन हा श्री गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त असल्याचे पुरोहित योगेश शास्त्री प्रभुणे यांनी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सूर्यास्तापूर्वी गणरायाची प्रतिष्ठापणा करावी, असेही त्यांनी सांगितले आहे. दिनांक 10 रोजी ज्येष्ठा गौरीचे आगमन होत असून 11 तारखेला ज्येष्ठा गौरीचे जेवण, तर 12 तारखेला त्यांचे विसर्जन होणार आहे. गणरायाच्या स्वागतानंतर गौरीच्या मुखवट्यासह तिचा साज शृंगार, दागिने, फराळाचे पदार्थ यांच्या खरेदीसाठी मिठाई बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. बाप्पांच्या आवडत्या आंबा मोदक, मावा मोदक, उकडीचे मोदक घेण्याकरता सातारकरांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. उकडीचे व मावा मोदक 30 रुपयाला एक याप्रमाणे उपलब्ध होते. सातारकरांनी या खरेदीला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. गणेशोत्सवाचा मोठा उत्साह बाजारपेठेत पहायला मिळाला. मोती चौक ते पंचमुखी गणेश परिसर तसेच राजपथ ते पोवई नाका यादरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी होत होती. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा अक्षरश: घाम निघाला.
शाहूनगरीत उद्या बाप्पांचे थाटात होणार आगमन
कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; 10 दिवस गणेशोत्सवाचे पारंपारिक कार्यक्रम
by Team Satara Today | published on : 06 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा