सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एसडीसीसी) रखडलेल्या नोकरभरती प्रक्रियेला अखेर पुन्हा गती मिळाली आहे. भरतीवरील स्थगिती हटवल्यानंतर बँकेने पात्रता यादीतील उमेदवारांकडून नियुक्तीपूर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मार्च 2026 मध्ये बँकेने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर अंतिम पात्रता यादीबाबत काही उमेदवारांनी आक्षेप घेत विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार व पणन विभागाने 30 मार्च 2026 रोजी भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली होती.
यानंतर सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्ह्यात लागू झालेल्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया पुढे सरकू शकली नव्हती. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थगिती उठविण्यात आली असून, भरतीचा पुढील टप्पा सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली.
सध्या पात्र उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत ऑनलाइन सूचना पाठविण्यात येत आहेत. कागदपत्रांची छाननी आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने नियुक्तिपत्रे देऊन उमेदवारांना सेवेत सामावून घेतले जाणार आहे.
भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व अद्ययावत सूचना बँकेच्या अधिकृत ऑनलाइन माध्यमातून प्रसिद्ध केल्या जाणार असून, पात्र उमेदवारांनी निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन बँकेच्या प्रशासनाने केले आहे