नसरापूर अत्याचार प्रकरण: पीडितेच्या नातेवाईकांचा नवले पुलावर ठिय्या, पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला

by Team Satara Today | published on : 02 May 2026


पुणे : नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आता तीव्र झाले असून, संतप्त नातेवाईकांनी पुण्याच्या नवले पुलावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पीडितेच्या कुटुंबाला पूर्णतः न्याय मिळत नाही आणि नराधम आरोपीला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या आंदोलनाचे गांभीर्य अधिक वाढले आहे कारण नातेवाईकांनी पीडितेचा मृतदेह थेट नवले पुलावर आणून ठेवला आहे. न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेत नातेवाईकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालेल, परंतु गुन्हेगाराला फाशी मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. नसरापूर येथे १ मे रोजी एका ६५ वर्षीय व्यक्तीने घरासमोर खेळणाऱ्या या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

​या घटनेची दखल घेत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः नसरापूरला भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शासन केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, ठोस कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईक अजूनही आंदोलनावर ठाम आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेंद्रे येथे अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ४१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
साताऱ्यात महाराष्ट्र दिनासोबत ‘गुलमोहर दिन’ उत्साहात; निसर्ग, कला आणि पर्यावरणप्रेमाचा अनोखा संगम

संबंधित बातम्या