डॉ. शालिनीताई पाटील : लढवय्या, करारी नेत्या

by Team Satara Today | published on : 20 December 2025


थोर स्वातंत्र्य सेनानी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी म्हणून डॉ. शालिनीताई पाटील महाराष्ट्राला परिचित होत्याच; परंतु त्यातच समाधान न मानता शालिनीताईंनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्रात अभ्यासू, करारी, स्पष्टवक्त्या आणि लढवय्या नेत्या म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. स्व. वसंतदादांचा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड दबदबा होता. त्यांना शालिनीताईंनी खंबीरपणे साथ दिली. 

दादांचे शिक्षण कमी झालेले, तर शालिनीताई उच्चशिक्षित. त्यांनी महाराणी ताराराणी यांच्यावर पीएचडी केली होती. सातारा जिल्ह्यातील सातारारोड पाडळी हे त्यांचे माहेर. माहेरकडून त्यांना सत्यशोधकी विचारांचा वारसा लाभला होता. विवाहानंतर त्यांना राजकीय वारसाही मिळाला. अभ्यासुवृत्ती, वैचारिक बैठक, लढाऊ बाणा, स्पष्टवक्तेपणा आणि विलक्षण शिस्तप्रियता या त्यांच्या अंगभूत गुणांना वसंतदादांच्या रूपाने राजकीय व्यासपीठ उपलब्ध झाल्याने त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द झळाळून निघाली. काँग्रेसच्या झुंजार नेत्या म्हणून त्यांनीही कारकीर्द गाजवली.

इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय

डॉ. शालिनीताई पाटील या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू, कणखर आणि प्रशासनाची सखोल जाण असलेल्या नेत्या होत्या. त्यांनी दीर्घकाळ विधिमंडळात प्रभावी भूमिका बजावली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून त्या महाराष्ट्राला परिचित होत्या. त्या काळात शालिनीताई महाराष्ट्राच्या राजकारणातील केवळ वलयांकित नव्हे तर शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला महसूल मंत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी शेतकरी, ग्रामीण विकास, जमीन महसूल व्यवस्था आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. सांगलीतून त्या काही खासदार होत्या. 

शिवसेनेच्या साथीने 'जरंडेश्वर'ची उभारणी 

नंतरच्या काळात सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुका ही आपली मातृभूमी हीच कर्मभूमी मानून कोरेगाव तालुक्याच्या उत्कर्षाचे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यासाठी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व वसंतदादा पाटील यांच्यात राजकारणापलीकडचे एक बांधिलकीचे नाते होते. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांशी शालिनीताईंनी कौटुंबिक नाते सांभाळले होते. त्याचा त्यांना कारखाना उभारणीत उपयोग झाला. १९९५ ते १९९९ च्या युती शासनाच्या काळात शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची जरंडेश्वरच्या उभारणीत मोठी मदत झाली. यातून कोरेगावच्या हरितक्रांतीचा पाया घातला गेला. 

सन १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून डॉ. शालिनीताई पाटील विधानसभेचे सभापती शंकरराव जगताप यांचा पराभव करून कोरेगावातून निवडून आल्या. सलग दहा वर्षे त्यांनी विधानसभेत कोरेगावचे प्रतिनिधित्व केले. या काळात कृष्णा - भीमा स्थिरीकरण प्रकल्पासारख्या ज्वलंत विषयावर त्यांनी विधिमंडळात तसेच जनमानसातही आवाज उठवला. पवनचक्क्यांच्या विरोधातील त्यांच्या आंदोलनाची सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

आरक्षणाच्या लढ्याची पायाभरणी

यादरम्यान आर्थिक निकषावर आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी महाराष्ट्रात रान उठवले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. सर्वत्र त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतरच्या काळात मराठा आरक्षणासाठी जो लढा उभारला गेला त्याची पायाभरणी शालिनीताईंच्या या आंदोलनामुळे झाली असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

शालिनीताईंनी राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी हित, जमिनीचे प्रश्न, वतनदारी व इनाम जमिनींचे प्रश्न, तसेच सामान्य जनतेच्या महसूलविषयक अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी ठोस भूमिका घेतली. राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही त्या सक्रिय होत्या. त्यांच्या कार्यामुळे त्या महिला सक्षमीकरणाच्या आदर्श नेत्या म्हणून ओळखल्या जातात. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेच्या विरोधात त्या गेली काही वर्षे न्यायालयीन लढाई लढत होत्या. सभासदांच्या घामातून उभा राहिलेला हा साखर कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहावा हा त्यांचा अट्टाहास होता. लांबत जाणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा त्यांचा लढा अधुरा राहिला याचे दुःख जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांना सदैव राहील.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्व. वसंतरावदादा पाटील यांच्या पत्नी, माजी महसूल मंत्री, खासदार व आमदार ज्येष्ठ नेत्या डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यामध्ये पालिका निवडणूक निकालांची उत्सुकता; औद्योगिक वसाहतीत वखार महामंडळांना पोलिसांचा गराडा 'जिल्हा प्रशासनाची रंगीत तालीम

संबंधित बातम्या