सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2026 ते 2031 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, नामनिर्देशन अर्जांच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 25 सप्टेंबर रोजी 202 अर्जांची विक्री झाली होती. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी आणखी 155 अर्जांची विक्री झाल्याने आतापर्यंत एकूण 357 अर्जांची विक्री झाली आहे.
25 सप्टेंबर रोजी सहा उमेदवारांचे सात नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. तर 28 सप्टेंबर रोजी 16 उमेदवारांचे 18 अर्ज दाखल झाले. त्यामुळे आतापर्यंत 22 उमेदवारांचे 25 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. 28 सप्टेंबर रोजी खंडाळा विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष मतदारसंघातून शामराव लक्ष्मणराव गाढवे, फलटण मतदारसंघातून श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर, पाटण मतदारसंघातून सत्यजित विक्रमसिंह पाटणकर व यासेन विक्रमसिंह पाटणकर यांनी अर्ज दाखल केले.
कराड मतदारसंघातून उदयसिंह विलासराव पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले. विजाभज राखीव प्रवर्गातून शिवाजीराव शंकरराव शेळके पाटील व लहुराज गणपती जाधव, तर इतर मागासवर्गीय राखीव प्रवर्गातून शंकर रामचंद्र माळवदे व रज्जाक अब्दुल मुलानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
नागरी बँका, नागरी सहकारी पतपेढ्या, ग्रामीण बिगरशेती संस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्था मतदारसंघातून मनोज भीमराव घोरपडे यांनी दोन अर्ज दाखल केले. महिला राखीव प्रवर्गातून सुरभी मदन भोसले, शशिकला मुगुटराव जाधव (देशमुख) व प्रमिला चंद्रकांत कदम यांनी, औद्योगिक व मजूर मतदारसंघातून विक्रम जयसिंगराव जाधव यांनी, तर कृषी प्रक्रिया मतदारसंघातून श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला.
दरम्यान, उर्वरित 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी केवळ उमेदवार किंवा सूचक यांनीच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी प्रवेश करावा. इतर समर्थक व सोबत्यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश करू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा यांनी केले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँक निवडणुकीत अर्जविक्रीला वेग; 357 अर्जांची विक्री, दोन दिवसांत 34 उमेदवारांचे 36 नामनिर्देशन अर्ज दाखल
by Team Satara Today | published on : 28 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा