सातारा : बोरगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या संयुक्त कारवाईत शेतीपंपांच्या कॉपर वायर आणि डी.पी. (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 26 चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून 20 लाख 22 हजार 482 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतीपंपांच्या कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी संबंधित पथकांना गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक एम. ई. पाटील, बोरगाव डी.बी. पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळांची पाहणी करून गोपनीय माहितीदारांचे जाळे सक्रिय केले. सायबर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान हर्षद सुनील जाधव (रा. सासपडे), स्वप्नील संजय मगर (रा. ढोरोशी), विकास वाल्मिक कदम (रा. मरळोशी), विवेक विजय लादे (रा. सासपडे) आणि शेखर चंद्रकांत सावंत (रा. निवडे) या पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी मुख्य आरोपी सागर चंद्रकांत मोरे (रा. भुडकेवाडी, ता. पाटण) व इतर साथीदारांच्या मदतीने बोरगाव, कोरेगाव, सातारा तालुका, सातारा शहर, भुईंज आणि उंब्रज पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले एक पिकअप वाहन, चार मोटारसायकली, पाच मोबाईल फोन, चोरीचे कॉपर साहित्य तसेच रोख रक्कम असा एकूण 20 लाख 22 हजार 482 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे बोरगाव पोलीस ठाण्याचे 5, कोरेगावचे 10, सातारा तालुक्याचे 5, सातारा शहरचे 2, भुईंजचे 3 आणि उंब्रज पोलीस ठाण्याचा 1 अशा एकूण 26 गुन्ह्यांची उकल झाली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली. अटक आरोपींकडील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एम. बसवंत करीत आहेत.