सातारा : सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, या मागणीसाठी जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटनेकडून कार्यालयाबाहेर बुधवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या कर्मचार्यांची आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचार्यांना राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करावा, वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते अदा करावेत, एकाच पदावर 24 वर्षे काम करणार्या कर्मचार्यांना सेवानिवृत्तीनंतर सुधारित आश्वासित प्रगती योजना सुरू करावी, त्यांना घरभाडे-भत्ता द्यावा, कर्मचार्यांच्या वारसांना अनुकंपा पद्धतीने सेवेत सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने कर्मचार्यांची भेट घेतली. तसेच त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देखील दिली. या उपोषणात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.