पालिका निवडणुकीच्या रिंगणात जिल्ह्यात 673 उमेदवार; दुरंगी, तिरंगी चौरंगी लढतीमुळे राजकीय रंगत वाढणार

by Team Satara Today | published on : 21 November 2025


सातारा :  सातारा जिल्ह्यातील नवनगरपालिका व एक नगरपंचायत यांच्या राजकीय रणधुमाळीचे अंतिम चित्र शुक्रवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. रिंगणात उभे राहिलेल्या 1726 उमेदवारांपैकी 1053 उमेदवारांनी नेत्यांच्या शिष्टाईला मान देत माघार घेतली त्यामुळे 233 नगरसेवक पदांसाठी 673 उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तरंगी अशा लढती होणार आहेत. 

सातारा शहरामध्ये 50 जागांसाठी 178 उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार नशीब आजमावत आहेत. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमधून माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, शिवाजी भोसले, बाळासाहेब शिंदे, अशोक मोरे, सुहास मोरे यांनी माघार घेतली. अमोल मोहिते,  सुवर्णादेवी पाटील यांच्या मुख्य उमेदवारीसह अपक्ष उमेदवार शरद काटकर, सनी काटे, रवींद्र भणगे, गणेश भिसे, सागर भिसे, सुधीर विसापूर, अभिजीत बिचकुले हे नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.

वाईमध्ये राष्ट्रवादीला मिळणार आव्हान

वाई नगरपालिकेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे येथे राष्ट्रवादीला कट्टर लढत मिळणार आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत होत असून 22 जागांसाठी 61 उमेदवार रिंगणात उरले आहेत सर्वपक्षीय उमेदवारांनी आज माघार घेतली. महाविकास आघाडीतून तेजपाल वाघ व शिवसेनेचे प्रवीण शिंदे भाजपचे विजय ढेकणे यांनी नगराध्यक्ष पदाच्या रेस मधून माघार घेतली. 

फलटणमध्ये राजे गटाला पारंपारिक आव्हान

फलटण नगरपालिकेसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आव्हान दिले आहे. येथे 27 नगरसेवकांच्या जागेसाठी 76 जण रिंगणात आहेत.नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी एकूण 78 जण रिंगणात असून 31 जणांनी आज माघार घेतली आहे.

महाबळेश्वरात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत असून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या एकूण 20 उमेदवारांनी आज माघारी घेतली राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक सुनील शिंदे, लोक मित्र जनसेवा आघाडीचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर व अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक कुमार शिंदे अशी तिरंगी लढत येथे होत आहे.

रहिमतपूर येथे नगराध्यक्षपदासाठी दुरंगी लढत पाहायला येथे मिळणार आहे. 20 जागांसाठी 65 जण  रिंगणात होते. माघारी नंतर 40 जण रिंगणात उरले आहेत. राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस यांनी एकत्रितपणे भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. आता नंदिना माने राष्ट्रवादी व मित्रपक्ष विरुद्ध वैशाली माने भाजप अशी समोरासमोर लढत होणार आहे.

पाचगणीमध्ये वीस जागांसाठी 118 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र माघारी नंतर 75 जण रिंगणात उरले आहेत. एकूण 43 जणांनी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर माघार घेतली ना. मकरंद पाटील यांनी माजी उपनगराध्यक्ष दिलीप बगाडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. माजी नगराध्यक्ष संतोष कांबळे यांचे बंधू दीपक कांबळे, सुनील बगाडे,  सुनील कांबळे,  विजय वने,  दास चवरिया आणि अमोल सावंत हेही रिंगणात आहेत.

म्हसवडला नगराध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. पूजा विरकर, भाजप भुवनेश्वर राजेमाने,. राष्ट्रवादी व महाविकास आघाडी रूपाली सरतापे बसपा या तिघी रिंगणात उरले आहेत. नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी आता 46 उमेदवार उरले आहेत.

कराडमध्ये 31 जागांसाठी 109 जण रिंगणात उरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी नऊ जणांनी शड्डू ठोकला आहे यामध्ये राजेंद्रसिंह यादव,  यशवंत विकास आघाडी व लोकशाही विकास आघाडी विनायक पावस्कर, भाजप व झाकीर पठाण, काँग्रेसचे रणजीत पाटील यांच्यात मुख्य लढत होईल.

मलकापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि भाजप असा तिरंगी सामना रंगेल. भाजपचे तेजस सोनावले राष्ट्रवादी व समविचारी पक्षांचे आर्यन कांबळे व शिवसेनेच्या वतीने अक्षय मोहिते यांची उमेदवारी कायम असून काँग्रेसचे संजय तडाखे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. नगरसेवक पदाच्या 22 जागांमधील 42 जण रिंगणात उरले आहेत.

मेढा येथे नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत

मेढा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे दोन नगरसेविका बिनविरोध तर  नगराध्यक्षपदामध्ये भाजप व शिवसेना दोघांमध्ये जोरदार टसल होणार आहे.  शुक्रवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे.  नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार रूपाली वारागडे व शिवसेनेच्या रेश्मा करंजेकर दोन प्रबळ उमेदवार असून राष्ट्रवादीच्या सुनीता पार्टे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. अपक्ष म्हणून माजी नगरसेविका शुभांगी गोरे यांचा अर्ज राहिला आहे. मेढ्यात नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 41 जण रिंगणात आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मॅग्नेशिया कंपनी गोडाऊनला भीषण आग; आठ कोटींचे नुकसान; जीवितहानी नाही
पुढील बातमी
साताऱ्यात अपक्षांची नेत्यांसमोर शरणागती; तीन दिवसात 89 उमेदवारांची माघार, 50 जागांसाठी 178 उमेदवार रिंगणात,नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत नऊ जण

संबंधित बातम्या