कोरेगावात दोन एकर ऊस आगीत जळून खाक; सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान

by Team Satara Today | published on : 14 October 2025


सातारा : कोरेगाव -सातारारोड रस्त्यावर  हनुमाननगर परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता अचानक लागलेल्या आगीत बाबुराव दिनकरराव बर्गे व जयवंत रामचंद्र बर्गे यांच्या दोन एकर शेतातील आडसाली ऊस जळून पूर्णपणे खाक झाला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

लहान मुले फटाके फोडत असताना त्यातील ठिणगी पडून ऊस शेतीला आग लागली. निवास बनसोडे, सुभाष बनसोडे, अफताब मुल्ला, अनिकेत ठिगळे, दस्तगीर सय्यद, शरीफ सय्यद, निखिल बनसोडे, हैदर कुरेशी, भूषण बनसोडे, मुन्ना कुरेशी, अल्फाज कुरेशी, अरबाज शेख, ऋषिकेश ठिगळे, गणेश बनसोडे, तोहीद शेख, वाहिद शेख, युसुफ शेख, अफजल कुरेशी, फैयाज शेख, कादिर कुरेशी यांच्यासह स्थानिक  नागरिकांनी आपल्या राहत्या घरातील कूपनलिकांच्या साह्याने पाण्याचा मोठा फवारा मारत आग आटोक्यात आणली. 

याबाबत शेतकरी सुरेश बर्गे व जयवंत बर्गे यांनी सांगितले की, दोन एकर शेतामध्ये आडसाली उसाची लागण केली होती. आत्ता ऊस १८ महिन्यांचा झाला होता तसेच तो चाळीस कांड्यांवर होता. या उसासाठी ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आली होती. शेतातील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला असून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
करंजे-म्हसवे रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी करंजे येथील नागरिकांचा रास्ता रोकोचा इशारा

संबंधित बातम्या