सातारा : ऊसदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभारलेल्या आंदोलनामुळे सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ३९०० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्यास मान्यता द्यावी लागली. याचा थेट आर्थिक फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही पहिल्यांदाच चार हजारांवर टनाला भाव मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. तरीही कोल्हापूर पॅटर्नमधील तीन महत्त्वपूर्ण अटी कारखानदारांनी मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे ऊसदराची लढाई संपलेली नाही, असा स्पष्ट इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. पण, कोणत्याही कारखान्यांनी दर जाहीर केला नव्हता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे शस्त्र उगारले. नागठाणे येथे महामार्ग अडविण्यात आला. त्यानंतरही ऊस वाहतूक वाहने अडविण्यात आली. यामुळे कारखानदार आणि प्रशासनालाही भूमिका घ्यावी लागली. यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुनभाऊ साळुंखे, धनंजय महामूलकर, सूर्यभान जाधव, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, रयत क्रांतीचे युवक जिल्हाध्यक्ष सोनू साबळे तसेच शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत बहुतांशी साखर कारखान्यांच्यावतीने पहिली उचल टनाला ३९०० रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे शेतकरी संघटनांचे आंदोलन तात्पुरते थांबले आहे. पण, कोल्हापूर पॅटर्नसाठी लढा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखल्यानंतर आंदोलन मागे घेताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून कोल्हापूर ऊसदराचा फॉर्म्युला निश्चित केला होता. या फॉर्म्युल्यानुसार पहिली उचल ३९०० रुपये, गाळप हंगाम संपल्यानंतर प्रतिटन १०० रुपये अतिरिक्त, पुढील हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा दर प्रतिक्विंटल ४५०० रुपयांच्या आसपास गेल्यानंतर प्रतिटन २०० रुपये अतिरिक्त आणि साखरेचा दर ४५०० रुपयांच्या पुढे गेल्यास वाढीव उत्पन्नातील ७० टक्के वाटा शेतकऱ्यांना तर ३० टक्के वाटा कारखानदारांना, असे सूत्र ठरविण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात या फॉर्म्युल्याला मान्यता मिळाली. त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातही ३९०० रुपयांची पहिली उचल मान्य करण्यात आली आहे. मात्र, हंगामाअखेरचे १०० रुपये, साखरेचा दर ४५०० रुपये झाल्यानंतरचे २०० रुपये आणि त्यापुढील दरवाढीतील ७०:३० चा वाटा या तीन अटींबाबत सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. शेजारील कारखाने देतील तेव्हा आम्हीही देऊ, अशी भूमिका कारखानदारांनी मांडली असून, त्यासंदर्भात लेखी पत्रेही दिली आहेत.
शेतकरी संघटनांचा पहिला लढा यशस्वी; सातारा जिल्ह्यात प्रथमच उसाला ४ हजारांवर दर मिळणार, प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार यांची माहिती
by Team Satara Today | published on : 17 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा