सातारा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरच्या कथित विटंबनेचा मुद्दा आता साताऱ्यातही तापला आहे. या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पोवई नाका येथील शिवतीर्थावर एकत्र येत निषेध नोंदवला. शायना एन. सी. यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेशी संबंधित विषय हा शिवसैनिकांच्या जिव्हाळ्याचा आणि भावनिक अस्मितेचा असल्याचे सांगत आंदोलकांनी संबंधित प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. राजकीय मतभेद कितीही असले तरी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचा अवमान सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला. याचवेळी शिंदे गटाने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली.
उपनेते नितीन बानुगडे-पाटील आणि उपनेत्या छायाताई शिंदे यांच्या सूचनेनुसार, संपर्कप्रमुख उदय दळवी व जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटिका अमृता पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच विविध अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. घोषणाबाजी आणि निषेधाच्या माध्यमातून पक्षाने या प्रकरणी आक्रमक भूमिका मांडली.
या आंदोलनामुळे पोवई नाका परिसरात राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनाची माहिती शहरप्रमुख प्रणव सावंत यांनी दिली.
बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या अवमानावरून साताऱ्यात ठाकरे गट आक्रमक; शिवतीर्थावर निषेधाचा आवाज
शायना एन. सी. यांच्याविरोधात शिवसैनिकांचा संताप; घोषणाबाजीने पोवई नाका दणाणला
by Team Satara Today | published on : 20 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा