सातारा : पुण्यातील पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन खरेदी गैरव्यवहार या घटनेची मला पूर्वमाहिती नव्हती. माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहेत. जनतेची कामे करणाऱ्यांवरच आरोप होतात. एक रुपया कुणाला दिला नाही, घेतला नाही. मग व्यवहार झाला कसा? याप्रकरणी चौकशीसाठी कमिटी बसली आहे, सर्व माहिती लवकरच समोर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार व्यक्त केला.
रहिमतपूर येथे रविवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शहाजी क्षीरसागर आणि संभाजीराव गायकवाड यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट पक्षात प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांची उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले, सुनील माने यांचा पक्षप्रवेश नाही, ती घरवापसी आहे. जनतेची कामे करण्यासाठी सत्ता आवश्यक असते. विरोधी पक्षात असताना आंदोलने आणि उपोषणे करता येतात; पण जनतेची कामे सत्तेतूनच होतात. आम्ही भाजपसोबत गेलो आहोत; पण विचारधारा सोडलेली नाही. माझ्यावर ७० हजार कोटींचा घोटाळा केला म्हणून आरोप केला; परंतु यामध्ये काही तथ्य नाही. या प्रकरणात माझ्या नातेवाइकांच्या घरी छापे टाकण्यात आले. काही सापडले नाही. परंतु प्रचंड त्रास सहन करावा लागला. तुम्हाला वाटतच असेल तर त्यातील फक्त शंभर कोटीच मला द्या. माझ्या दहा पिढ्या बसून खात्याल, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
अजित पवार म्हणाले, जरंडेश्वर साखर कारखाना अडीच हजार क्षमतेचा. तो या भागातल्या लोकांना चालवता आला नाही; परंतु मी आता मोठ्या क्षमतेने आणि ताकदीने चालवतोय. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देतोय. माझ्यापेक्षा दुसरा इतर कुठला कारखाना जास्त दर देत असेल तर शेतकऱ्यांनी त्या कारखान्याला ऊस घालवा. परंतु या भागातील काही कारखानदारांनी गेल्या वर्षीचे अजून पैसे दिले नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी माझ्याकडे केल्या आहेत. शेतकऱ्यांना जिथे ऊस घालायचा असेल तिथे ऊस घालावा; पण पैसे देणाऱ्या कारखान्याकडेच घालावा.
रहिमतपूर परिसरातील रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे केले गेले आणि त्यासाठी सुनील माने उपोषणाला बसले होते. मी माझ्या बारामतीमध्ये रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची करून घेतो. सकाळी सहा वाजताच कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतो. राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी पुणे जिल्हा बँक उत्तम चालली आहे. सातारा जिल्हा बँक आज राज्यात एक नंबरला आहे.