सातारा : जम्मू-काश्मीर राज्यातील पहेलगाम येथे सैनिकी वेशात येऊन पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालणार्या दहशतवाद्यांचा वेळीच खात्मा झाला पाहिजे. ही घटना देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारी आणि मानवतेला गिळंकृत करणारी आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांमध्ये भारतातील इतर राज्यांसह महाराष्ट्रातील पर्यटक नागरिकांवर क्रौर्याची परिसीमा गाठली गेली. या दुर्दैवी प्रसंगाची माहिती घेतली तेव्हा मन अतिशय उद्विग्न झाले. या क्रूर भ्याड हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी आमचा संपूर्ण महाराष्ट्र ठामपणे उभा आहे. अशा वारंवार घडलेल्या आतंकवादी कारवायांमुळे हजारो जीव हकनाक जीवाला मुकले आहेत. आता कोणतीही कसूर न ठेवता देशाच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कठोर निर्णय घेऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे. संपूर्ण देशातील नागरिक सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असे देखील उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.