सातारा : वाई येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालयात तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण डॉ. अशोक जोशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप यादव, उपाध्यक्ष श्रीमती वृषाली चव्हाण, संचालक ऍड. श्रीकांत चव्हाण, संस्था निरीक्षक एच.के पवार, प्रा.पंडित टापरे, अल्पना यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. जोशी म्हणाले त्यांच्या जीवनावर पूर्णपणे तर्कतीर्थांच्या विचारांची छाप आहे. जातीपाती मानू नकोस, धर्मनिरपेक्ष वाग, मोठा हो, पैसे कमाव पण ते मानवतेसाठी खर्च कर, असा सल्ला तर्कतीर्थानी दिल्याचे त्यांनी सांगितले. दहावीत 90टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मधुकर लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती वितरण सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेतील सुप्रसिद्ध व्यावसायिक मायकेल गनेल उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. जोशी होते.
वाईच्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्रतिष्ठानने विद्यालयास भेट दिलेल्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण डॉ. जोशी यांच्या हस्ते झाले. विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या आय लर्न झोनचे उद्घाटन मायकेल गनेल यांच्या हस्ते झाले. यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गौरव यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र कांबळे यांनी केले. अरुंधती जाधव यांनी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. परविन मुल्ला व सारिका ढेकाणे यांनी उपक्रमाचे वाचन केले. उप मुख्याध्यापक गणेश ससाने यांनी आभार मानले. राजेश भोज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.