26 मार्च डेडलाईन; मात्र महामार्ग अद्याप अपूर्णावस्थेतच

रोजच वाहनचालकांना करावा लागतोय ट्रॅफिक जाम चा सामना; लोकप्रतिनिधींची मात्र चुप्पी

by Team Satara Today | published on : 09 May 2026


- विनित जवळकर

सातारा : सातारा जिल्ह्यातून जाणार्‍या पुणे-बंगळुरु अशियाई महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 26 मार्च ही डेडलाईन केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत अजूनही सातारा-कोल्हापूर महामार्गावर काम अपूर्णावस्थेतच असल्याने वाहनचालकांना रोजच ट्रॅफिक जाम चा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांमधून तीव्र संतापाचे वातावरण आहे.

पुणे-बंगळुरु आशियाई महामार्ग हा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरुन दररोज लाखो प्रवासी वाहने, माल वाहतूक वाहने, कंटेनर्स, दुचाकी, रिक्षा धावत असतात. या वाहनांच्या सुरक्षित वहनासाठी केंद्र सरकारने महामार्गाचे सहापदरीकरण करण्याची योजना आखली. या योजनेस याआधीही एक डेडलाईन दिली होती. मात्र, कंत्राटदारांच्या गलथान कारभारामुळे अगदी निवांतपणे महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरु होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, कराडचे आमदार अतुलबाबा भोसले यांनी संसदेत आवाज उठवला होता. त्यावर आधीच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून हे काम 26 मार्चच्या डेडलाईनवर दुसर्‍या कंपनीला देण्यात आले. मात्र याही कंत्राटदाराने आधीच्या कंत्राटदाराची री ओढत काम सावकाश पद्धतीने सुरु ठेवले आहे. परिणामी मे महिन्याची 26 तारीख आली तरीही हे काम अपूर्णच आहे. वास्तविक पाहता आधीच्या कंत्राटदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ करूनही नवीन कंपनीने कामाचा वेग न वाढवणे, हे धक्कादायक आहे. जेव्हा एखाद्या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरून थेट डेडलाईन दिली जाते, तेव्हा कामाची गती राखणे अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले नाही. अन्यथा या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण झाले असते. आता याबाबत मात्र लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधल्याचेच दिसून येत आहे. कोणीही या अपूर्ण कामाबाबत ब्र उच्चारायला तयार नाही.

सहापदरीकरणात प्रामुख्याने उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोड यांची कामे अपूर्ण असल्याने स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक एकमेकांत मिसळते, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. सातारा-कोल्हापूर महामार्गावर कित्येक ठिकाणी ही कामे अपूर्ण असल्याने अपघातांची संख्याही वाढतच आहे. हे कंत्राटदारांच्या कार्यक्षमतेवर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या धाकावर मोठे प्रश्‍नचिन्ह उभे करते. 

महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रवासी, वाहनधारकांचा वेळ व इंधन वाया जात आहे. त्यांच्या ठरवलेल्या स्थानापर्यंत पोहोचण्यास त्यांना विलंब होत आहे. या विलंबामुळे वाहनचालकांना केवळ ट्रॅफिक जामलाच सामोरे जावे लागत नाही, तर तासवडे, किणी, खेड शिवापूर आणि आनेवाडी यांसारख्या टोल नाक्यांवर महामार्गाचे काम पूर्ण नसताना टोल का भरायचा? हा संतापजनक प्रश्‍नही नागरिक विचारत आहेत.

जूनमध्ये पावसाळा सुरू होईल. जर पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण आणि पुलांची महत्त्वाची कामे पूर्ण झाली नाहीत, तर रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढेल. पुणे-बंगळुरू सारख्या व्यस्त मार्गावर तासन्तास वाहतूक ठप्प होईल. 2022 मध्ये वेग पकडलेल्या या महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांसह प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ट्रॅफिक जाम मध्ये रुग्णवाहिका सुद्धा अडकत असल्याने रुग्णांचेही अतोनात हाल होत आहेत. आपल्या जवळचा व्यक्ती केवळ या ट्रॅफिक जाममुळे योग्य उपचारां अभावी तडफडताना त्या रुग्णवाहिकेतील नातेवाईकांना उघड्या डोळ्यांनी पहावे लागत आहे. 

नागठाणे-अतीत दरम्यानच्या ट्रॅफिक जाममुळे तर कित्येक वेळा प्रवाशांना एकेक-दोन दोन तास त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक ठिकाणी रस्ते गुळगुळीत झाल्याने डायमंड ग्रायंडिंग मशीन फिरवण्यात आली आहे. मात्र, यानंतर हा रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याचे कष्ट कोणीही घेतलेले नाहीत. परिणामी याचा त्रास दुचाकी चालकांना होत आहे. मशीन फिरवलेल्या भागातून दुचाकी मार्ग बदलतात. यामुळे छोटे-मोठे अपघात होतात.

यानिमित्ताने नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया आणि संबंधित कंत्राटदार यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. केवळ डेडलाईन बदलून प्रश्‍न सुटणार नाहीत, तर आता प्रत्यक्ष कामाचा अहवाल मागवून कामात कसूर करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. आशियाई महामार्ग हा केवळ रस्ता नसून पश्‍चिम महाराष्ट्राची आर्थिक वाहिनी आहे; तिची अशी अवस्था होणे खेदजनक आहे. मात्र, या मार्गावरील ‘बॉटलनेक्स’ (अडथळे) दूर झाल्याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रवास सुसह्य होणार नाही, हेही तितकेच खरे.

मंत्री गडकरींसमोर होणार महामार्गाचा पंचनामा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार म्हटल्यावर पुणे-सातारा महामार्गावरील कामे वायुवेगाने पूर्ण करण्यात आली. मात्र, त्यांना पश्‍चिम बंगालच्या शपथविधीनंतर पुण्याला पोहोचण्यास वेळ लागल्यामुळे भुईंज येथील किसन वीर कारखान्यावरील आबासाहेब वीर पुरस्काराचा कार्यक्रम काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, मंत्री महोदयांचा सातारा दौरा लवकर ठरल्यास सातारा-कागल महामार्गावरील अनन्वित प्रश्‍नांचे पाढे प्रवासी व वाहनधारकांकडून त्यांच्यासमोर वाचण्यात येतील, यात शंकाच नाही.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सामाजिक परिवर्तनासाठी संघर्षाची मशाल कायम पेटती ठेवू - राजू परुळेकर; सातार्‍यात भटके-विमुक्त संस्थेच्या सन्मान सोहळ्यात विचारवंतांचा निर्धार
पुढील बातमी
शोषितांसाठी चळवळ उभारण्याचे डॉ. सोनझरिया मिंझ यांचे आवाहन; “उरलेल्यांनी संघर्षासाठी एकत्र यावे”; विद्रोही संमेलनातून व्यवस्थेविरोधात संताप;

संबंधित बातम्या