वाई : वाई शहरातील रविवार पेठेतील रांगोळी आळी परिसरातील सारथी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या फ्लॅटला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांची मोठी धावपळ झाली फ्लॅटमधून आग लागल्याचे निदर्शनास येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ वाई नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाची गाडी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, अपार्टमेंटमधील फ्लॅटला आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने आग पसरण्यापूर्वीच ती आटोक्यात आणण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीमुळे फ्लॅटमधील किती नुकसान झाले, याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही.
वाईत अपार्टमेंटमधील फ्लॅटला अचानक आग; अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने आग आटोक्यात
by Team Satara Today | published on : 16 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा