कोयना जलाशयात मुनावळे परिसरात फ्लेमिंगोंचा मुक्काम; पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण

by Team Satara Today | published on : 10 June 2026


कास : स्थलांतरित पक्ष्यांमध्ये विशेष आकर्षण असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्लेमिंगो पक्षी (रोहित पक्षी) कोयना जलाशयातील मुनावळे परिसरात प्रथमच दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनामुळे पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्‍यान, फ्‍लेमिंगो हे पर्यावरणातील जैवविविधतेचे महत्त्वाचे प्रतीक मानले जातात. त्‍यामुळे त्‍यांचे यंदा येथे दिसून आलेले आश्रयस्‍थान येथील जैवविविधतेलाही अधोरेखित करीत असल्‍याचे जाणकारांचे मत आहे.

मुनावळे परिसरातील जलाशयाच्या उथळ भागात फ्लेमिंगोंचा थवा विसावलेला पाहायला मिळत आहे. लांब पाय, वाकडी चोच आणि गुलाबी- पांढऱ्या रंगाच्या आकर्षक पिसांमुळे हे पक्षी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. जलाशयातील सुरक्षित अधिवास, मुबलक खाद्य आणि शांत वातावरणामुळे या स्थलांतरित पक्ष्यांनी कोयना जलाशयाची निवड केली असावी, असे जाणकारांचे मत आहे.

दरवर्षी विविध देशांमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी भारतातील जलक्षेत्रांमध्ये दाखल होतात. यंदा मुनावळे परिसरात त्यांचे दर्शन झाल्याने कोयना परिसराच्या जैवविविधतेत भर पडली आहे. स्थानिक नागरिक आणि छायाचित्रकारांकडून फ्लेमिंगोंचे छायाचित्रण सुरू असून, त्यांच्या उपस्थितीमुळे पक्षीनिरीक्षण पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या दुर्मिळ पाहुण्या पक्ष्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखावे, मोठ्या आवाजाचा वापर टाळावा आणि परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन वन्यजीव अभ्यासकांनी केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दहिवडीच्या उत्कर्षा जाधवला मानाचे ‘रिव्हॉल्व्हर’ ; सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरतानाच, मानाच्या ‘रिव्हॉल्वर’चाही मान पटकावला
पुढील बातमी
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर भीषण स्फोटात कराड तालुक्यातील शहापुरचे वीरजवान अर्जुन जाधव शहीद

संबंधित बातम्या