जिल्हा कारागृहात ‘दिवाळी पहाट’ संगीतमय मैफल उत्साहात संपन्न; सुरांच्या मेजवानीने बंदीवान मंत्रमुग्ध

by Team Satara Today | published on : 19 November 2026


सातारा : येथील जिल्हा कारागृहात कारागृह विभाग आणि साताऱ्याच्या ओम एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट’ हा संगीतमय कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. सप्तसूर सांगीतिक संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या सुमधुर गीतांनी कारागृहातील वातावरणात चैतन्य निर्माण केले असून, या उपक्रमाला बंदीवान आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बंदीवानांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी आणि त्यांना सणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या विशेष सांस्कृतिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या मैफलीत सप्तसूर सांगीतिक संस्थेचे सुनील भोजने, चंद्रशेखर बोकील, रेवती बंड, श्रुती शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकापेक्षा एक सरस भावगीते, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते तसेच लोकप्रिय मराठी व हिंदी गाण्यांचे सादरीकरण केले. कलाकारांच्या या बहारदार गायनाने उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात कारागृहातील काही बंदीवानांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपली गायन कला सादर केली, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
सदर उपक्रम अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. जिल्हा कारागृह अधीक्षक ब्रह्मदेव लटपटे आणि ओम एज्युकेशन सोसायटीच्या स्वरूपा पोरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारागृहातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेची चोख जबाबदारी सांभाळून या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे बंदीवानांमध्ये मानसिक शांतता व परिवर्तनाची भावना निर्माण होण्यास मदत होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वीज चोरी व एमएसईबीची फसवणूक केल्‍याप्रकरणी वाढे येथील दोघांवर गुन्‍हा दाखल

संबंधित बातम्या