सातारा : हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. यानिमित्ताने येथील स्वराज मंगल कार्यालयात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे संघटक समन्वयक हेमंत सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संघटनेच्या जिल्हा संघटिका भक्ती डाफळे, सनातन संस्थेच्या प्रसार सेवक सौ. विद्या कदम, हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या रूपा महाडिक इत्यादी यावेळी उपस्थित होते.
सोनवणे पुढे म्हणाले, सध्या संपूर्ण विश्व युद्धाच्या अग्नी दिव्यातून जात आहे. भारतात जिहादी आतंकवादी हिंदूंची हत्या करून भारताला युद्धाकडे ओढत आहेत. व्यक्तीमधील क्षात्र प्रवृत्ती जागृत करणे आणि गुरु शिष्यांच्या परंपरेची आठवण करून देणे या निमित्ताने साताऱ्यात गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सकाळी 11 वाजता गुरुपूजन होणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन, स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके, लघुपट, सामूहिक रामनाम जप, याशिवाय सायंकाळी साडेचार वाजता युद्धकाळातील कर्तव्य व साधना यावर मान्यवर वक्त्यांची मार्गदर्शन सत्रे होणार आहेत.
ब्रिगेडियर हेमंत महाजन व सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक स्वाती खाडे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. गोवा येथे झालेल्या शंखनाद महोत्सवाची दृश्य चित्रे यावेळी दाखवली जाणार आहेत. सातारकरांनी या गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.