सातारा : आपला जन्म कसा झाला हे कोणीही सांगते. पण, आईचा जन्म कसा झाला, हे मला सांगू वाटले. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला नायक म्हणून कोणी दाखवलेच नाही. आईला प्राधान्य दिले पाहिजे, हेच ही कादंबरी लिहिण्यामागची प्रेरणा आहे. असंख्य स्त्रियांनी जगणे भोगले आहे. तेच मी आईच्या माध्यमातून मांडले आहे, असे प्रतिपादन लेखक देवा झिंजाड यांनी केले.
सातारा नगरपालिका व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या वतीने आयोजित मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त लेखक देवा झिंजाड यांनी 'एक भाकर तीन चुली : पित्तृसत्ताक' कादंबरीचे अंतरंग उलघडून दाखवले. यावेळी देवा झिंजाड यांनी 'खरच क्रांती झाली पाहिजे', 'आई' या कविता सादर केल्या. आईविषयी त्यांनी सादर केलेल्या कवितेने उपस्थितांचे डोळे पाणावले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी देवा झिंजाड यांची मुलाखत घेतली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, शाहूपुरीचे माजी सरपंच सिध्दार्थ निकाळजे, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता सहकारी बँकेचे संचालक ॲड. चंद्रकांत बेबले, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, श्रीराम नानल, डॉ. राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, लेखिका शुभांगी दळवी, आर. डी. पाटील, सचिन सावंत आदींची उपस्थिती होती.
देवा झिंजाड म्हणाले, आपला जन्म कसा झाला हे कोणीही सांगते, पण आईचा जन्म कसा झाला, हे मला सांगू वाटले. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला नायक म्हणून कोणी दाखवलेच नाही. आईला प्राधान्य दिले पाहिजे, हेच ही कादंबरी लिहिण्यामागची प्रेरणा आहे. असंख्य स्त्रियांनी जगणे भोगले आहे. तेच मी आईच्या माध्यमातून मांडले आहे. ज्या नायकाचे चरित्र घडविले आहे, त्या आत्माला केवळ दुय्यम पात्र दाखवायचे नाही. ज्या आत्म्याने आपल्याला घडविले, त्या आत्म्याचे चरित्र लिहिले पाहिजे, या भावनेतून ही कादंबरी लिहिली आहे.
सुनीताराजे पवार म्हणाल्या, शाहूपुरी शाखेने सातत्याने मराठी भाषा पंधरवडा साजरा केला असून, तो दर्जेदार पध्दतीने केला जात आहे. विनोद कुलकर्णी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेत वेगळ्या पध्दतीचे बदल घडवून आणले आहेत.
विनोद कुलकर्णी प्रास्ताविकात म्हणाले, महाराष्ट्रात प्रथमच मराठी भाषा पंधरवडा सुरु केला.
साताऱ्यातील साहित्य चळवळ संपुष्टात येत असताना शाहूपुरी शाखेचे स्थापना केली. सलग १४ वर्षे हा पंधरवडा सुरु ठेवला आहे. कोरोना काळातही ऑनलाईन पध्दतीने हे कार्यक्रम घेतले होते. भविष्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन घ्यायचे आहे. सुनिताराजे पवार हे संमेलन मिळवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतील. संमेलन मिळण्यासाठी त्या शिफारस करतील.