डॉक्टरला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून ५० लाखांची खंडणी; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 14 December 2025


सातारा : डॉक्टरला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी म्हसवड (ता. माण) येथील पाच जणांविरोधात खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका डॉक्टरच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी संग्राम शेटे, दिनेश गोरे, अमोल राऊत, नितीन केवटे आणि दीपक रुपनवर (सर्व रा. म्हसवड, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब मारुती दोलताडे (वय ४६, रा. दोलताडे हॉस्पिटल, शिंगणापूर रोड, म्हसवड) यांचे म्हसवड येथे खासगी रुग्णालय आहे. त्यांच्या रुग्णालयात कार्यरत असलेला लक्ष्मण राखोंडे याने सुमारे ७ लाख रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. याशिवाय डॉक्टरांनी राखोंडे याला उचल स्वरूपात दिलेली रक्कम सुमारे २७ लाख रुपयांच्या आसपास होती. त्यानंतर राखोंडे पत्नीसमवेत रुग्णालय सोडून पळून गेला.या संदर्भात डॉक्टरांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी संशयितांनी संगनमत करून एका महिलेमार्फत सीएमएस पोर्टलवर बलात्काराची खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप आहे.

सदर बलात्कार प्रकरण मिटवण्यासाठी डॉक्टर दोलताडे यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. रक्कम न दिल्यास ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकारामुळे भयभीत झालेल्या डॉक्टरांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्यानंतर खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा पुढील तपासासाठी म्हसवड पोलीस ठाण्यात ‘झिरो’ क्रमांकाने वर्ग करण्यात आला असून, तपास सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.ऑक्टोबर २०२५ ते १० डिसेंबर या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पारधी समाजाचे इतरत्र पुनर्वसन करा; रेवडी ग्रामस्थांची मागणी, लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन
पुढील बातमी
प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी लिहिलेल्या 'शरद पवार आणि पुलोदचा प्रयोग' या पुस्तकाचे प्रकाशन

संबंधित बातम्या