सातारा : मानवी शरीराला अपायकारक ठरणाऱ्या डॉल्बी यंत्रणेच्या विरोधात आता ज्येष्ठ नागरिकांच्या निमित्ताने सुरू झालेल्या आंदोलनाला धार आली आहे. सातारा शहरातील सुमारे 15 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक संघटना आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येत डॉल्बी विरोधी नारा साताऱ्यात बुलंद केला आहे. याचा एक भाग म्हणून गुरुवारी साताऱ्यात प्रदूषण नियंत्रण महामंडळाला निवेदन सादर करण्यात आले.
तसेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता येथील पंचमुखी गणपती मंदिरासमोर डॉल्बीमुक्तीची बुद्धी सर्वांना मिळो, या मागणीसाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाची माहिती डीजे विरोधी आंदोलन समन्वय समितीचे समन्वयक व ज्ञानविकास मंडळाचे कार्यवाह प्रसाद चाफेकर यांनी दिली आहे. पुण्यशील सुमित्रा राजे भोसले ज्येष्ठ नागरिक संघ, जेष्ठ नागरिक संघ शाहूनगर, अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ, पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघ सदर बाजार, समता ज्येष्ठ नागरिक संघ माऊली, ज्येष्ठ नागरिक संघ कोडोली, अभिनव जेष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ करंजे, समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संघ, समर्थ मंदिर जेष्ठ नागरिक संघ, राजवाडा सहवास महिला जेष्ठ नागरिक संघ, धर्मादाय संस्था असलेली के कर्मवीर डॉक्टर मार्तंडराव सूर्यवंशी फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, लेखापरीक्षकांची इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडिया, सातारा ज्ञानविकास मंडळ इत्यादी 16 संस्था डॉल्बी यंत्रणेच्या विरोधात एकत्र आले आहेत. या संघटनांनी दिनांक 4 ऑगस्ट रोजी आणि शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पालकमंत्र्यांना निवेदन सादर केली होते. तरी देखील शासनाने डीजे बंदी संदर्भात निर्णय घेतलेला नाही.
डॉल्बी यंत्रणांवर शासनाने कायमस्वरूपी पूर्णपणे बंदी आणावी, अशी संपूर्ण सातारकरांची मागणी आहे. मूठभर देखील नसलेल्या डीजे मालकांसाठी महाराष्ट्र शासन कोट्यवधी नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्याला वेठीस धरत आहे. गणेशोत्सवामध्ये हा डीजे गणेश भक्तांना एकत्र आणण्याऐवजी पळवून लावण्याचे काम करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या संध्याकाळी आपले हृदय आणि कान शाबूत ठेवण्यासाठी या डीजेच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागत आहे हे दुर्दैवी आहे, असे निवेदनात नमूद आहे. येथील प्रशासकीय इमारतीमधील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियंत्रकांना आज निवेदन सादर करण्यात आले. तसेच राज्य शासनाला लवकरच याबाबत निर्णय घेण्याची गणराय सुबुद्धी देवो, यासाठी पंचमुखी गणपती समोर शुक्रवारी सकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.