सातारा : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील मुलांमुलीसाठी राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे स्वरूप अजून व्यापक झाले पाहिजे व ही योजना तळागळातील सर्वापर्यत पाहोचली पाहिजे. शासनाच्या महत्वकांक्षी या योजनेचा सर्व पालकांनी आपल्या पाल्यांच्या आरोग्याविषयी जागरूक व सतर्क राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी याप्रसंगी केले.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम 2.0 या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाले. जिल्ह्यात या मोहिमेचे उद्घाटन जिजामाता प्रॅक्ट्रिसिंग स्कुल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी डॉ. करपे बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्था सचिव विकास देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहूलदेव खाडे, वैद्यकिय अधिकारी बाहय संपर्क डॉ. सुभाष कदम, ए.डी.एच.ओ. सहसचिव रयत शिक्षण संस्था शिवलिंग मेणकुदले, बि.एन.पवार, सहविभागीय अधिकारी निकम, जिजामाता प्रॉक्ट्रिसिंग स्कुल मुख्याध्यापिका सौ. चैत्राली भोसले, जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या विश्राती कदम उपस्थित होत्या.
डॉ. करपे म्हणाले, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील मुलांमुलीसाठी राबवण्यात येत आहे. त्यांच्या सर्वागीण आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभाग, एकात्मीक बालविकास शिक्षण विभाग व नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने 2013 पासून राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबवण्यात येत आहे.0 ते 18 वयोगटातील जिल्ह्यातील 4 लाख 37 हजार 274 बालकांची आरोग्य तपासणी प्रतिवर्षी करण्यात येते. आजपर्यत या योजनेतुन 1 हजार 308 ह्दय शस्त्रक्रिया व 14 हजार 610 इतर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. या कार्यक्रमाचे स्वरूप अजून व्यापक झाले पाहिजे व ही योजना तळागळातील सर्वापर्यत पाहोचवणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी देशमुख म्हणाले, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम हि शासनाची अतिशय महत्वाची योजना असून सुदृढ व सशक्त बालक हेच उदयाच्या भारताचे भविष्य आहे. त्यामुळे यांच्या आरोग्याबाबत पालकांनी जागरूक राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.