सातारा : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सीमारेषेवर कर्तव्य बजावणारे पवारवाडी (ता. जावळी) येथील सुपुत्र जवान तुषार राजेंद्र भिलारे (वय ३४) अखेर काळाच्या पडद्याआड गेले. सुट्टीवर गावी आले असताना झाडावरून पडून झालेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुषार यांच्यावर पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. बुधवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘अमर रहे... अमर रहे... जवान तुषार भिलारे अमर रहे!’ या घोषणांनी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला.
जवान तुषार भिलारे हे मध्यप्रदेशातील महू येथे भारतीय सैन्यात कार्यरत होते. देशसेवा करत असताना सुट्टीसाठी गावी आलेल्या या कर्तव्यदक्ष जवानाच्या अकाली निधनाची बातमी समजताच पवारवाडीसह संपूर्ण जावळी तालुक्यावर शोककळा पसरली. गावकऱ्यांचे डोळे त्यांच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत लागले होते.
बुधवारी पार्थिव गावात दाखल होताच आनेवाडीपासून सजवलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. मार्गातील प्रत्येक गावात नागरिकांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी पुष्पवृष्टी करत आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा सलाम केला. ‘भारत माता की जय’ आणि ‘तुषार भिलारे अमर रहे’च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने तरुण, ग्रामस्थ आणि नागरिक सहभागी झाले होते.
पवारवाडीत पार्थिव पोहोचताच अंतिम दर्शनासाठी जनसागर उसळला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि डोळ्यांत अश्रू होते. स्मशानभूमीत भारतीय सैन्य, पोलीस दल आणि प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर शासकीय इतमामात मानवंदना देत बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.
मात्र सर्वाधिक हृदय हेलावून टाकणारा क्षण म्हणजे तुषार यांच्या पार्थिवाजवळ आई-वडील, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींनी फोडलेला आक्रोश. आपल्या घरातील आधारवड हरपल्याच्या वेदनेने कुटुंबीयांचा हंबरडा उपस्थितांच्या काळजाला चिरून गेला. अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
याप्रसंगी आर्मीचे अधिकारी व जवान, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी, सातारा पोलीस दल, तहसीलदार प्रवीण मुदगल, जिल्हा परिषद सदस्या जयश्री गिरी, पंचायत समिती सदस्या चारूशीला पवार, मेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील,जयहिंद फाउंडेशनचे सचिव उमेश मोरे,मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवान तुषार भिलारे यांचा सावडणे विधी गुरुवारी सकाळी ९ वाजता पवारवाडी येथे होणार आहे.