मेढ्यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा

by Team Satara Today | published on : 06 March 2025


मेढा : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत अमानुषपणे हत्या झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्या निषेधार्थ मेढ्यात वेण्णा चौक ते तहसीलदार कार्यालय असा मूक मोर्चा काढला होता. या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी जावळीच्या तहसीलदारांना दिले आहे.

या निवेदनात म्हणले आहे, की बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर समाजमन हेलावून गेले आहे. या हत्याकाडांतील सहभागी आरोपींनी ज्या पद्धतीने मारहाण केली. त्यांच्या देहाची विटंबना केली हे दाखल केलेल्या आरोपपत्रातील फोटो वरून दिसून येत आहे. यापूर्वीही माध्यमांवर अनेक प्रकारच्या मारहाणीच्या व्हिडिओ व फोटो समाजाने पाहिले आहेत. एखाद्या जनावरालाही अशा पद्धतीने मारले जात नाही, अशा पद्धतीने संतोष देशमुख यांना मारलेले आहे.

या आरोपींच्या मनात कायद्याची भीती दिसून येत नाही. त्यामुळे अशा मस्तवाल, निर्ढावलेल्या गुन्हेगारांना फाशीची आणि फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. संतोष देशमुख हे गरीब कुटुंबातील असून, त्यांचा परिवार उघडा पडता कामा नये, यासाठी सरकारने या कुटुंबाला जास्तीतजास्त मदत करायला हवी. त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. आपल्या राज्यात अशा घटना घडतात हेच मुळी संतापजनक व दुर्दैवी आहे.

या निवेदनावर व्यसनमुक्तीचे राज्याध्यक्ष विलासबाब जवळ, दत्ता पवार, बजरंग चौधरी, संजय सुर्वे, संतोष वारागडे, सुरेश पार्टे व जावलीकरांच्या सह्या आहेत. या मोर्चात जावळीतील विविध गावचे सरपंच व शेकडो जावळीकरांनी सहभाग घेतला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी दहाजणांवर गुन्हा
पुढील बातमी
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

संबंधित बातम्या