सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी सत्तेचा वापर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; अंगापूर वंदन येथे नागरी सत्कार

by Team Satara Today | published on : 20 April 2026


सातारा : सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी सत्तेचा वापर करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

अंगापूर वंदन, ता. सातारा येथे आयोजित भव्य नागरी सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव,चंद्रहार पाटील यांच्यासह सरपंच प्रियांका निकम आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आज अंगापूर वासियांमुळे गणपतीच्या दर्शनाचा योग आला त्याचा आनंद आहे. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळातलोकाभिमुख निर्णय घेता आले याचे समाधान. आपण किती संपत्ती कमावली यापेक्षा किती माणसं कमावली आणि किती माणसांचे प्रेम कमवले हे महत्त्वाचे आहे. लाडक्या बहिणी, शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी अहोरात्र काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे दिवस येवो हीच गजाननाच्या चरणी प्रार्थना आहे. 

अंगापूर गावाने एक गाव एक गणपती ही परंपरा सुरू केली आहे तिचा आदर्श राज्यातील सर्व गावांत घ्यावा. अंगापूर वंदन गावाला नुकताच ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. या गावाच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. ब वर्ग पर्यटन केंद्राचा निधी आता दोन कोटी वरून पाच कोटी केल्याचेही  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी सांगितले. 

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, अंगापूर वंदन गावाला ब वर्ग दर्जा दिला आहे. गावच्या विकासासाठी साडेचार कोटीचा निधी दिला आहे. येथून पुढेही गावच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही शासनावर लोकांनी दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थकी लागेल असा विश्वास पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास सोसायटीचे अध्यक्ष किशोर कणसे यांनी केले. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यात ३ दिवस पावसाची शक्यता; २१ रोजी यलो अलर्ट, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
पुढील बातमी
अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त धोम डावा कालवा उपविभागातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

संबंधित बातम्या