नाशिक : कोणत्याही शासकीय कामातील दरवाढ फारतर दीडपट करणे शक्य असताना गतवेळच्या कुंभमेळ्यात ३५०० कोटींचा खर्च तर यावेळच्या कुंभमेळ्यासाठी दसपट अधिक ३५ हजार कोटींची मंजुरीच मुळात कशी देण्यात आली असा सवाल करत कुंभमेळ्याच्या कामांमध्ये ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत कमिशन लाटले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
महाजन हे पालकमंत्री नव्हे, नाशिकचे मुख्यमंत्री!
नाशिक जिल्ह्याला प्रदीर्घ कालावधीनंतर पालकमंत्रीपद देण्यात आले असून हे पालकमंत्री म्हणजे जणू काही नाशिकचे मुख्यमंत्रीच झाल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. त्यांना दिलेले कुंभमेळा मंत्रीपद हे खरेच स्वतंत्र संवैधानिक पद आहे का? याबाबत मी थेट राज्यपालांकडेच विचारणा करणार असल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले.
२०१४ मध्येच सत्तेसाठी तीन पक्षांचा प्रस्ताव
२०१४ च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीकडून शिवसेनेला बरोबर सत्ता हातात घेण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर मांडण्यात आला होता. मात्र, तो प्रस्ताव मी उभ्या-उभ्याच फेटाळल्याचा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. मात्र, त्यानंतरच्या ५ वर्षांत भाजपने आमच्या दोन्ही पक्षांतील १७५ नेत्यांना पळवून नेल्याचे आमच्या वरिष्ठ नेतृत्वाला पटवून दिले.