सातारा : राज्य शासनाकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2026 ही रविवार दि.21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून या परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया दि. 27 मार्च पासून सुरु झाल्याची मााहिती पुणे येथील महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली.
इयत्ता 1 ली ते 5 वी साठी पेपर 1 सकाळी 10.30 ते दुपारी 1 वा. व इयत्ता 6 वी ते 8 वी साठी पेपर 2 दुपारी 2.30 ते 5 वा पर्यंत वेळ मर्यादा आहे. सर्व व्यवस्थापन, सर्व परिक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक अथवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परिक्षा होणे अनिवार्य आहे. या परिक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिल 2026 पर्यंत आहे. 9 ते 21 जून पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी. काही प्रशासकीय अडचणीमुळे या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने परिक्षार्थ्यांनी अद्यावत माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळास नियमित भेट द्यावी, असे आवाहनही परीक्षा परिषदेचे आयुक्त श्री.चोथे यांनी कळविले आहे.