साताऱ्यात मराठा समाजाच्या वतीने मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार

महिनाभरात सातारा गॅझेटीअर लागू करणार शिवेंद्रसिंहराजेची ग्वाही

by Team Satara Today | published on : 04 September 2025


सातारा : एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा विविध घोषणांनी गुरुवारी शिवतीर्थ दणाणले. मराठा समन्वयक समिती व सकल मराठा समाज यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.  या सत्कारापूर्वी मराठा बांधवांनी हैदराबाद गॅझेट जीआरचे साताऱ्यात जोरदार स्वागत केले. यावेळी शिवतीर्थावर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. हलगी व तुतारी निनादाने वातावरणामध्ये वेगळाच जोश निर्माण केला होता. 

मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासंदर्भात, गेल्या अडीच दशकाच्या संघर्षाची अंतिम फलित सिद्ध झाल्याची भावना याप्रसंगी व्यक्त झाली. मराठा समन्वयक समितीचे तात्या सावंत विभागीय अधिस्वीकृत समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे समन्वयक सदस्य शरद काटकर यांनी शिवतीर्थावर सर्व मराठा बांधवांना सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आगामी सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीच्या संदर्भात शुभेच्छा दिल्या. सर्व मराठा बांधव भगवे फेटे भगवी उपरणे आणि शिवतीर्थावर डौलाने फडकणारा भगवा ध्वज सारेच वातावरण भगवे मय होऊन गेले होते. हरीश पाटणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेळोवेळी घेतलेल्या आंदोलकाच्या भूमिकेचे कौतुक केले. तसेच सातारा गॅझेट हा काटेरी मुकुट आहे त्या दृष्टीने पुढे सूचक वाटचाल करावी लागणार आहे. उपसमितीने या माध्यमातून पुढील तयारी सुरू केली आहे. मराठा बांधवांनी जेवढे 54 मोर्चे काढले, त्यामध्ये स्वयंशस्तीचे दर्शन घडले. आता मसुदा अंतिम टप्प्यात आहे.  हैदराबाद गॅझेटचा जीआर आणि त्यानंतर सातारा गॅजेटची अंमलबजावणी या दृष्टीने व्यापक मांडणी होऊन सर्व समावेशक जीआर नक्की लागू होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद काटकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे साताऱ्यात मराठा भवन उभारण्याची मागणी केली. मराठा समाजाच्या संघर्षाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आपल्या योगदानाची निश्चित दखल घेतली जाईल, असे कौतुकोद्गार काढले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचे शिवतीर्थावर आगमन होताच, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. मराठा बांधवांनी मनापासून शुभेच्छा कौतुक करत त्यांच्या सर्वसमावेशक प्रयत्नांना दाद दिली. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या सारथी महामंडळासाठी साताऱ्यात स्वतंत्र कार्यालय मिळावे यासंदर्भात आपण निश्चित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू आणि त्यासाठी साताऱ्यात जागा उपलब्ध करू असे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रूपाली राक्षे यांचे सेट परीक्षेत यश
पुढील बातमी
गणेश विसर्जनासाठी सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल

संबंधित बातम्या