कराड : मागील सोमवारी रात्री कृष्णा नदीत उडी घेतलेल्या कल्पना बाळाप्पा वाघमारे या कराडमधील युवतीचा मृतदेह सातव्या दिवशी गोंदी (ता. कराड) गावाच्या हद्दीत कृष्णा नदी पात्रात आढळून आला. रविवारी मृतदेह तरंगताना दिसून आल्यानंतर ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर शवविच्छेदनासह अन्य कायदेशीर सोपस्कर पूर्ण करत रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कल्पना वाघमारे (वय 26, रा. वाखाण रोड, कराड, मूळ रा. जत, जि. सांगली) हिने सोमवार, 28 जुलै रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत उडी घेतली होती. कल्पनाचे लग्न ठरले होते. तसेच काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडाही झाला होता; मात्र अचानक सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कल्पना दुचाकीवरून पुलावर आली आणि तिने नदीत उडी घेतली होती.
या घटनेनंतर मागील सहा दिवसांपासून तिचा शोध घेतला जात होता. रविवारी सकाळी गोंदी गावच्या हद्दीतील नदीपात्रात एका युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर कराड ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. संबंधित मृतदेह कल्पनाचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली. याबाबतची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास कराडमधील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.