नवीन लाल कांद्याच्या आवकेत मोठी वाढ

पुणे : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात नवीन लाल कांद्याची आवक वाढली आहे. मंगळवारी (दि. 19) लिलावात 9 हजार 700 गोणी नवीन कांदा विक्रीस आला होता. प्रति 10 किलोस गावरान कांद्यास 711 रुपये व नवीन कांद्यास 510 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती सभापती संजय काळे, उपसभापती प्रितम काळे यांनी दिली.

साठवून ठेवलेल्या गावरान कांद्याची विक्री शेतकर्‍यांनी केल्याने या कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यातच पावसाळ्यात पेरणी व लागवड झालेला लाल सेंद्रिय नाशिक कांदा आता सर्वत्र विक्रीस येत आहे. 

या कांद्याच्या काढणीने वेग घेतल्याने विक्रीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. आळेफाटा उपबाजारातही या कांद्याची आवक चांगलीच वाढली आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व शेजारील पारनेर व संगमनेर तालुक्यातील हा कांदा विक्रीस येत आहे. या कांद्याचे विक्रीस येण्याचे प्रमाण वाढणार आहे. 

त्यातच या कांद्यास भाव चांगले मिळतात, मात्र पावसाचा फटका या कांद्याचे उत्पादनावर झाला आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात 10 हजार 700 गोणी कांदा विक्रीस आला होता. यातील 1 हजार गोणी गावरान कांदा होता, अशी माहिती सचिव रूपेश कवडे, कार्यालय प्रमुख प्रशांत महांबरे यांनी दिली.

ढगाळ हवामानाने कांदा उत्पादक चिंतेत

मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी, धामणी परिसरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून ढगाळ हवामानाचा फटाका कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे. त्यामुळे कांद्यांच्या फवारणीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

चालू वर्षी काद्यांला चांगला बाजारभाव मिळत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यात आली. या परिसरात काही शेतकर्‍यांचा कांदा एक ते दीड महिन्यांचा झाला आहे, तर काही शेतकरी अजूनही कांदा लागवड करत आहेत.

मात्र सध्या या परिसरात बदलत्या हवामानामुळे, कांदा पिकावर आळी, मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाती करपण्यास सुरुवात झाली आहे. शेतकर्‍यांना कांदा फवारणी करावी लागत असल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी मोठी आर्थिक झळ शेतकर्‍यांना सहन करावी लागणार आहे.

मागील बातमी
सुसाट वाहनांमुळे शेडगेवाडी रस्त्यावर अपघात
पुढील बातमी
छत्तीसगडमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक

संबंधित बातम्या