अमेरिका : अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यातील बोल्डर शहरात रविवारी (१ जून) इस्रायली ओलिसांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या ज्यू समुदायाच्या शांततापूर्ण आंदोलनावर हल्ला करण्यात आला. एका अज्ञात हल्लेखोराने पेट्रोल बॉम्ब फेकत हा हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात लहान मुलांसह 6 जण गंभीररित्या भाजले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहेत. अमेरिकेची सर्वोच्च तपास यंत्रणा एफबीआयने (FBI) या घटनेला “जाणीवपूर्वक केलेला दहशतवादी हल्ला” असे म्हटले आहे.
एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याप्रकरणी ४५ वर्षीय मोहम्मद सबरी सोलिमन याला अटक करण्यात आली आहे. सोलिमनने पर्ल स्ट्रीटवर सुरू असलेल्या शांततापूर्ण मोर्चावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यात काही लहान मुलं आणि आंदोलन करणारे नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत.
यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने ‘फ्री पॅलेस्टाईन’ अशा घोषणा दिल्या. या हल्लेखोराने माळीची वेशभूषा केली होती. ही वेशभूषा करत तो आंदोलनात सहभागी झाला. त्यानंतर त्याने अचानक पेट्रोल बॉम्ब फेकत हल्ला करण्यास सुरुवात केली. ही घटना Run for Their Lives यादरम्यान घडली. हा कार्यक्रम गाझामध्ये ७ ऑक्टोबर रोजी अपहरण करण्यात आलेल्या इस्रायली ओलिसांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आला होता.
या घटनेनंतर बोल्डर पोलीस विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी लवकरच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. “आमचे एजंट आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्या तपास करत आहेत. या प्रकरणाबद्दलची सर्व अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्की शेअर करु, अशी माहिती एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी दिली.
हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा ज्यू समुदायाचे लोक इस्रायली ओलिसांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या सुटकेसाठी शांततापूर्ण मार्गाने एकत्र येत होते. या घटनेमुळे अमेरिकेतील धार्मिक आणि अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. देशभरातून या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. या घटनेने अमेरिकेतील सामाजिक सलोखा आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.