सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील पहिला भक्कम पाया या गडाने घातला. तब्बल पंचवीस वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाने अनेक ऐतिहासिक घटना, शौर्यगाथा, राजकीय निर्णय आणि युद्धांचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला. मराठ्यांच्या पराक्रमाला व स्वराज्याच्या कर्तृत्वाला दिशा देणारा हा गड, केवळ एक किल्ला नसून स्वराज्याच्या आत्म्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे.
राजगड किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवास रोमांचकारी आहे. दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटा, खडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याचा आनंद यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो. गडावर पोहोचल्यानंतर दिसणारे विस्तीर्ण पर्वत आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य थकवा दूर करून मन भारावून टाकते. इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम राजगडावर अनुभवता येतो. हा किल्ला केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे दार आहे. इथली शांतता, प्राचीन वास्तू आणि डोंगरमाथ्यावर वाहणारा गार वारा प्रत्येकाला पुन्हा-पुन्हा येथे येण्यासाठी प्रेरित करतो.
प्राचीन इतिहास
आजचा राजगड किल्ला मुळात "मुरुंबदेव" या नावाने ओळखला जात होता. विविध राजवटींच्या अखत्यारीत असताना या ठिकाणी फक्त बालेकिल्ल्याचा भाग अस्तित्वात होता. परंतु इ.स. १६४३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेताच त्याचे पुनर्निर्माण सुरू झाले. तेव्हाच या गडाला "राजगड" म्हणजेच गडांचा राजा हे साजेसे नाव लाभले आणि स्वराज्याची राजधानी म्हणून तो घोषित करण्यात आला.
या गडावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. इथेच शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांचा जन्म झाला. त्यांची पत्नी सईबाई यांचे याच ठिकाणी दुःखद निधन झाले. १६६४ मध्ये सूरत लुटल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचे संरक्षण याच गडावर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढायांची रणनीती राजगडावर आखली. भक्कम तटबंदी, मजबूत बुरुज आणि चतुराईने बांधलेल्या रचना यामुळे हा किल्ला अभेद्य बनला. मुघल आणि आदिलशाही सैन्याने कित्येक वेळा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला.
आजही राजगड हा इतिहास, साहस आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे. पर्यटनासाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे. किल्ल्यावरील सुवेळा माची, संजीवनी माची आणि बालेकिल्ला ही विशेष आकर्षणाची ठिकाणे. राजगडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि धुके भरलेले निसर्गदृश्य मन मोहून टाकतात. इतिहासप्रेमी, साहसिक पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी राजगड एक अनोखा अनुभव देणारे ठिकाण आहे.
नैसर्गिक रचना आणि संरक्षण व्यवस्था
राजगड किल्ला मध्ययुगीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे. सुमारे ४० किलोमीटर परिघ असलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १३७६ मीटर आहे. भक्कम तटबंदी आणि सुयोग्य रचना यामुळे हा किल्ला संरक्षण आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.
या किल्ल्याचा मध्यभाग पद्मावती माची म्हणून ओळखला जातो. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते. पद्मावती देवीचे मंदिर, पद्मावती तलाव आणि राजवाड्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. ही माची केवळ निवासासाठीच नव्हे, तर सैन्याच्या हालचालींसाठीही अत्यंत महत्त्वाची होती.
किल्ल्याच्या पश्चिमेला संजीवनी माची आहे. येथे तीन स्तरांमध्ये बांधलेली तटबंदी आजही मराठ्यांच्या लढाऊ कौशल्याची साक्ष देते. शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही संरचना अत्यंत उपयुक्त ठरली. पूर्व बाजूला सुवेळा माची आहे. येथून दिसणारे निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. याच ठिकाणी “नेढे” नावाची मोठी नैसर्गिक दगडी कमान आहे. हा भूशास्त्रीय चमत्कार किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतो. बालेकिल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगेचे अप्रतिम दृश्य दिसते. पूर्वी येथे राजवाडा होता आणि याच ठिकाणी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असत.
राजगडाची भौगोलिक व लष्करी रचना अतिशय अद्वितीय आहे. किल्ला डोंगरांच्या उंचसखल उतारांवर बांधलेला असल्याने तो जिंकणे जवळजवळ अशक्य होते. एका सरळसरळ तटबंदीवर अवलंबून न राहता तीन प्रमुख माच्या – पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या गडाला त्रिसूत्री स्वरूपात जोडलेल्या आहेत. या प्रत्येक माचीचा आपापला वेगळा उपयोग होता :
पद्मावती माची – गडाचे हृदय मानली जाणारी ही माची प्रशासनिक व निवासी केंद्र होती. येथे राजसदर, पद्मावती देवीचे मंदिर, महाराजांचे निवासस्थान, राणीवसा तसेच मंत्र्यांचे निवासस्थान यांचा समावेश होता. मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यांमुळे या माचीवर वर्षभर पाणी उपलब्ध असे.
संजीवनी माची – पश्चिमेकडे पसरलेली ही माची मजबूत तटबंदी, अर्धगोलाकार बुरुज आणि पहारेकऱ्यांसाठी सोयीस्कर स्थानांनी युक्त होती. संरक्षण आणि आक्रमण अशा दोन्ही दृष्टींनी ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असे.
सुवेळा माची – पूर्वेकडे असलेली ही माची अरुंद व उग्र कड्यांवर पसरलेली आहे. येथे पाण्याची टाकी, पहारेकऱ्यांची ठाणी आणि गुप्त, अरुंद प्रवेशद्वार होते. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हे स्थान अनन्यसाधारण उपयोगी ठरत असे.
या तिन्ही माच्या एका ठिकाणी येऊन मिळतात – तो म्हणजे बालेकिल्ला. उंच मनोरे, भक्कम भिंती आणि विस्तीर्ण परिसरावर नजर ठेवणारा हा भाग म्हणजे गडाचा सर्वोच्च आणि अंतिम संरक्षणस्तर. गडाच्या प्रवेशासाठी पाली, गुंजवणे व अळू दरवाजा हे मार्ग वापरले जात. तसेच खडकात कोरलेल्या असंख्य टाक्यांमुळे पाणी व धान्यसाठा अखंड उपलब्ध राहावा याची काळजी घेण्यात आली होती.
गडाचे वैशिष्ट्य :
राजगडाच्या बांधणीत केवळ संरक्षणाचा विचार केलेला नव्हता, तर राजकारण, प्रशासन, सैनिक व्यवस्थापन आणि दीर्घकालीन टिकाऊपणा या सर्व बाबी लक्षात घेऊन गड उभारण्यात आला. वळणावळणाच्या पायवाटा, धान्यकोठारे, पहारेकऱ्यांच्या चौक्या यामुळे गड एक परिपूर्ण राजधानी ठरला.
सांस्कृतिक वारसा :
आजचा राजगड हा फक्त एक पुरातन अवशेष नाही, तर जिवंत वारशाचे प्रतीक आहे. येथे होणारे उत्सव गडाच्या ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून देतात. दिवाळीच्या वेळी होणारा दीपोत्सव संपूर्ण गडाला दिव्यांच्या उजेडात न्हाऊ घालतो. शिवजयंतीच्या दिवशी तर हजारो लोक गडावर जमतात. पारंपरिक वाद्ये, भाषणे, शिवचरित्रावर आधारित नाटिका यामुळे गड पुन्हा एकदा इतिहासाच्या सोनेरी क्षणात जगू लागतो.
जागतिक ओळख
इतिहास, वास्तुकला, युद्धतंत्र आणि सांस्कृतिक महत्त्व यांचा अनोखा संगम असलेला राजगड आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या मालिकेत समाविष्ट होऊन भारताचे आणि मराठ्यांचे वैभव जगभर पोचवत आहे. राजगड किल्ला केवळ ऐतिहासिक वारसा नाही, तर तो एक साहस, एक प्रवास आणि मराठ्यांच्या अदम्य शौर्याला वाहिलेली आदरांजली आहे. येथील प्रत्येक दगड भूतकाळाच्या कथा सांगतो. इतिहासप्रेमींना येथे मराठ्यांच्या विजयगाथांचा अनुभव येतो. ट्रेकिंगच्या चाहत्यांसाठी हा किल्ला एक रोमांचक आहे. निसर्गप्रेमींना येथे सह्याद्रीच्या भव्य सौंदर्याचे दर्शन होते. येथील शांतता आणि वारा मनाला ताजेतवाने करतो.
राजगड महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि पराक्रमाचे साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. येथे आल्यावर प्रत्येक क्षण संस्मरणीय वाटतो. एकदा का तुम्ही येथे पोहोचलात, तर हा प्रवास केवळ एक ट्रेक राहणार नाही, तर तो एक ऐतिहासिक अनुभव बनून हृदयात कोरला जाईल. राजगड तुमची वाट पाहतो आहे, चला निघा “गडांच्या राजाला” भेट द्यायला!
-संजय डी.ओरके
विभागीय संपर्क अधिकारी,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मंत्रालय, मुंबई