सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांना आजवर केवळ युद्धे, पराक्रम आणि ठराविक ऐतिहासिक घटनांपुरतेच मर्यादित ठेवले गेले आहे. मात्र, त्यापलीकडे असलेले विचारवंत, संवेदनशील आणि रयतेचा राजा म्हणून उभे राहिलेले शिवराय 'न पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराज' या नाटकातून प्रथमच रंगमंचावर सादर केले जात असल्याची माहिती विद्रोही अभिनेते किरण माने यांनी दिली.
सातारा पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्याभिषेकामागील खरा संघर्ष, त्यासाठी शिवाजी महाराजांना सहन कराव्या लागलेल्या यातना, स्वकियांकडून झालेले विरोध, तसेच राज्याभिषेकानंतर रयतेविषयी त्यांच्या विचारांतील बदल हे सर्व ठोस पुराव्यांसह या नाटकात मांडले आहे. हे नाटक केवळ इतिहास नाही, तर प्रेक्षकांना विचार करायला लावणारी कलाकृती आहे.
कोल्हापूर व पुण्यात हाऊसफुल्ल प्रयोग झाल्यानंतर दि. २५ जानेवारी रोजी सायं. ७ वा. शाहू कला मंदिर, सातारा आणि दि. २६ जानेवारी रोजी कराड येथे हा प्रयोग होणार आहे. हे नाटक कोणत्याही जाती-धर्माविरोधात नसून, समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश देणारे असल्याचे किरण माने यांनी सांगितले.इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या अभ्यासावर आधारित कथा, सतीश तांदळे यांचे लेखन व विनायक कोळवणकर यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या नाटकात लोकगीत, पोवाडा, भारूड, रॅपसह दर्जेदार संगीत आणि प्रभावी कलाकारांची फळी आहे. ''शिवराय म्हणजे तलवार नव्हे, तर समुद्रासारखे अथांग व्यक्तिमत्त्व आहे,'' असे सांगत त्यांनी रसिकांना हा प्रयोग आवर्जून पाहण्याचे आवाहन केले