सातारा, दि. 11 : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतणवणुकीवर पाच ते पंधरा टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून, सातार्यातील एका महिलेसह वीस जणांची तब्बल एक कोटी 31 लाख 49 हजार 923 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी टीपी ग्लोबल एफएक्स आणि आयएक्स ग्लोबल या कंपन्यांच्या एकूण 39 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेेठेत राहणारी संबंधित महिला शिक्षण क्षेत्रात असून, तिच्याशी संबंधित कंपन्यांच्या काही संचालकांनी समाजमाध्यमाद्वारे संपर्क साधला. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास, पाच ते पंधरा टक्के नफा मिळवून देतो, असे आमिष या कंपन्यांच्या संचालकांनी या महिलेच्या कुटुंबीयांना दाखवले. टीपी ग्लोबल एफएक्स आणि आयएक्स ग्लोबल एलसीई या फॉरेक्स ब्रोकर अमेरिकन कंपन्यांची भारतात शाखा असून, त्यांचे मुंबई येथे आय एक्स अॅकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड, आता बदलेले नाव पोचेन ग्लोबल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे.
त्या कंपनीच्या नावाखाली टीपी ग्लोबल एफएक्स फॉरेक्स ट्रेडिंग ऑटोमेशन सर्व्हिस देते. या कंपनीत गुंतवलेल्या रकमेवर पाच ते पंधरा टक्के मिळवून देते, असे या कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांना सांगितले. संबंधित महिलेला अधिक नफ्याचे आमिष दाखवून, 42 लाख 13 हजार 889 रुपयांची गुंतवणूक करायला लावली. या कंपनीने संबंधित महिलेला आधी सात लाख 25 हजार 878 रुपये नफा दिला. मात्र, त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे संबंधित महिलेची 34 लाख आठ हजार 811 रुपयांची आणि अन्य 19 जणांची सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित कंपनीच्या 39 संचालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.