मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज भोसलेंच्या नेतृत्वाखालील 'समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

by Team Satara Today | published on : 08 June 2026


कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज भोसलेंच्या नेतृत्वाखालील  'समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात सोमवारी (दि.८) सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरूवात होऊन निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवारांकडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.

कोल्हापूरसह पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर येथे राज्यातील १२ केंद्रांवर ४९.९० टक्के मतदान झाले होते. या मतदानात ३४०३ पैकी १६९८ मतदारांनी मतदान केले. राज्यातील एकूण टक्केवारीत कोल्हापुरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर सर्वाधिक मतदान झाले होते.

मेघराज भोसलेंच्या नेतृत्वाखाली 'समर्थ पॅनेल’चे विजयी उमेदवार : मेघराज राजेभोसले - निर्माता, सुनील महाजन - निर्माता, दिपक कदम - दिग्दर्शक, अजित शिरोळे - दिग्दर्शक, राज काझी - लेखक, सुशांत शेलार - अभिनेता, धनाजी यमकर - छायाचित्रण, शरद चव्हाण - ध्वनीरेखक, रवी गावडे - निर्मिती व्यवस्था, सुभाष नकाशे - नृत्य दिग्दर्शक, प्रवीण (वासू )पाटील - कला दिग्दर्शक, चैत्राली डोंगरे - रंगभूषा/वेशभूषा, गणेश गारगोटे - वितरण/प्रसिध्दी. विकास तोरणे - कामगार. 

तब्बल नऊ वर्षांनंतर चित्रपट महामंडळाची निवडणूक

तब्बल नऊ वर्षांनंतर चित्रपट महामंडळाची निवडणूक होत असल्याने सर्व चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले होते. महामंडळाच्या १७ जागांसाठी सुरुवातीला ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ जणांनी माघार तर ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे १४ जागांसाठी ४४ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत रंगली होती. मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेल, सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनेल आणि १६ अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीचे चित्र अधिकच रंगतदार बनले होते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाळकरी मुलीवर अत्‍याचार करणार्‍या तरुणास अटक; महाबळेश्वर पोलिस ठाण्यात बाल पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
पुढील बातमी
शाळा सोडल्याच्या दाखल्यांसाठी शुल्क घेतल्यास कारवाईचे शिक्षण विभागाचे आदेश; दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी दिलासा

संबंधित बातम्या